वारकरी संप्रदायाला समर्पित संमेलन; ह.भ.प. सुरेश महाराज सुळ भूषवणार अध्यक्षपद
। लोकजागर । फलटण । दि. १४ जानेवारी २०२६ ।
महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण, श्री सद्गुरु प्रतिष्ठान आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने फलटणमध्ये 30 व्या विभागीय मराठी साहित्य संमेलनाचे व स्व. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव वर्षानिमित्त समस्त वारकरी संप्रदायाला समर्पित करण्यात आले आहे. सदरचे संमेलन येथील महाराजा मंगल कार्यालय येथे गुरुवार, दिनांक 15 जानेवारी आणि शुक्रवार, दिनांक 16 जानेवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे, अशी माहिती संमेलन स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, संमेलन कार्याध्यक्ष डॉ.सचिन सूर्यवंशी – बेडके व संमेलन संयोजक रविंद्र बेडकिहाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
संमेलनाचे उद्घाटन गुरुवार, दि.15 रोजी सकाळी 10:30 वाजता 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते होईल. या संमेलनाचे अध्यक्षपद अकलुज येथील श्री ज्ञानाई गुरुकुलचे ह.भ.प. सुरेश महाराज सुळ भूषवणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. याच सत्रात ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे यांना स्व.सुभाषराव नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) स्मृतीप्रित्यर्थ ‘यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव’ पुरस्कार, अहिल्यानगर येथील नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक कडूभाऊ काळे यांना महाराजा मल्टिस्टेट को – ऑप. क्रेडिट सोसायटी पुरस्कृत ‘यशवंतराव चव्हाण सहकार गौरव’ पुरस्कार, सौ. वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पुणे येथील संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशक सुनिताराजे पवार यांना ‘सौ. वेणूताई चव्हाण सामाजिक कृतज्ञता’ पुरस्कार आणि फलटण येथील इंदिरा महिला सहकारी संस्थेला ज्येष्ठ लेखिका सौ. सुलेखा शिंदे यांच्या स्मरणार्थ ‘सौ.सुलेखा शिंदे सामाजिक सामाजिक कृतज्ञता’ पुरस्कारानी सन्मानित करण्यात येणार आहे.
संमेलनाच्या पहिल्या दिवशी दुपारी 2 वाजता ‘समाज प्रबोधनात वारकरी संप्रदायाची भूमिका’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला आहे, ज्याचे अध्यक्षपद चैतन्य जप प्रकल्पाचे कार्याध्यक्ष धैर्यशील देशमुख भूषवतील. या परिसंवादात इंदापूर येथील कामधेनू परिवाराचे डॉ. लक्ष्मण आसबे, फलटण येथील ज्येष्ठ प्रवचनकार व गीताअभ्यासक सौ. पुष्पाताई कदम व फलटण येथील ग्रामीण कथाकार प्रा. रवींद्र कोकरे विचार व्यक्त करणार आहेत. सायंकाळी 5 वाजता फलटण येथील राम कृष्ण महिला भजनी मंडळाद्वारे गीतरामायणाचे सादरीकरण होईल.
संमेलनाच्या दुसर्या दिवशी दि. 16 रोजी सकाळी 10:30 वाजता मायणी येथील कथाकथनकार सौ. रंजना सानप आणि बारामती येथील ग्रामीण कथाकथनकार प्रा. विजय काकडे यांचे कथाकथन होणार आहे. यावेळी माळेगाव येथील श्री संत जैतुनबी उर्फ जयदास महाराज परिवार, डॉ. लक्ष्मण आसबे, वाल्हे येथील अंध तबलावादक पिंटूबाबा कुडाळकर, वक्तत्त्वकलेत पारंगत असणारी कु. राजनंदिनी पडर, गीता अभ्यासक कु. ज्ञानदा कदम, बाल चित्रकार कु. ऋतुजा वेदपाठक यांचा विशेष सत्कार होणार आहे. तसेच यावेळी माणदेशी कवी ताराचंद्र आवळे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन रंगणार आहे. यामध्ये चंद्रकांत चाबुकस्वार (दौंड), प्रा. अशोक शिंदे (फलटण), युवराज खलाटे (कांबळेश्वर), सौ. क्रांती पाटील (वाई), प्रमोद जगताप (पिंप्रद), बबन धुमाळ (दौंड), श्रीमती आशाताई दळवी (दुधेबावी), संजय पांचाळ (वाजेगाव), विरेन सटाले (फलटण) कवीता सादर करणार आहेत. संमेलनाच्या निमित्ताने हनुमंत संभाजी कुमकुले लिखीत ‘कालचक्रातील माझा प्रवास’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन यावेळी ह.भ.प.सुरेश महाराज सुळ यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
दि. 16 रोजी दुपारी 4 वाजता संमेलनाची सांगता मलवडी येथील श्री माऊली सांप्रदायिक सोंगी भारुड मंडळाच्या भारुडाने आणि संमेलनाध्यक्ष ह.भ.प.सुरेश महाराज सुळ यांच्या अध्यक्षीय भाषणाने होणार आहे.
तरी या संमेलनास फलटणकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
