बीबी येथील वक्तव्याचा भाजप-राष्ट्रवादीच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून समाचार; खालच्या पातळीवरील टीका खपवून घेणार नाही असा इशारा
। लोकजागर । फलटण । दि. १४ जानेवारी २०२६ ।
फलटण तालुक्यातील बिबी येथील जाहीर सभेत श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर केलेल्या टीकेचा फलटणमधील सत्ताधारी गटाने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. नगरपालिकेचे माजी गटनेते अशोकराव जाधव यांनी अनिकेतराजेंवर पलटवार करताना म्हटले की, “बीबीच्या सभेत केवळ मुक्ताफळे उधळण्याचे काम झाले आहे. जे स्वतः नगरसेवक असताना पालिकेच्या बैठकांना फिरकले नाहीत, त्यांनी इतरांवर बोलू नये. समशेरदादा हे हिमतीने आणि लोकांच्या पाठिंब्याने लोकनियुक्त नगराध्यक्ष झाले आहेत. राजकारणात ‘जो जिता वही सिकंदर’ असतो, हे त्यांनी लक्षात ठेवावे.” समशेरसिंह यांनी विरोधी पक्षनेते म्हणून सक्षम काम केल्यामुळेच जनतेने त्यांना कौल दिला आहे, असेही जाधव यांनी ठणकावून सांगितले.
विकासाच्या आड येऊ नका; रणजितसिंह भोसले आणि बापूराव शिंदे यांचा इशारा
रणजितसिंह भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले की, निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून चुकीच्या पद्धतीने टीका केली जात आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे फलटणच्या विकासासाठी आग्रही आहेत आणि त्यांचा हा विकासप्रवास रोखण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे. भाजप तालुकाध्यक्ष बापूराव शिंदे यांनीही सांगितले की, दुसऱ्यावर बोलण्यापेक्षा लोकांच्या कामावर लक्ष दिले असते, तर आज तुम्हाला लोक सोडून गेले नसते. रणजीतदादांच्या विकासाच्या व्हिजनवर लोकांचा विश्वास आहे.
भाषणशैली सुधारा, अन्यथा त्याच भाषेत उत्तर देऊ: अमोल सस्ते
भाजप पश्चिम विभागाचे तालुक्याध्यक्ष अमोल सस्ते यांनी अनिकेतराजेंच्या टिकेचा निषेध करताना सांगितले की, पराभवामुळे ही मंडळी ‘डिप्रेशन’ मध्ये गेली असून त्यातूनच खालच्या पातळीवर वक्तव्ये केली जात आहेत. ३० वर्षे सत्ता भोगूनही ज्यांनी काही केले नाही, ते आज आमच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमावर बोलत आहेत. जनतेने नाकारलेल्या लोकांनी आपली भाषाशैली सुधारावी, अन्यथा आम्हीही त्याच भाषेत उत्तर देऊ, असा सज्जड इशारा त्यांनी दिला. वल्लभ हेंद्रे यांनीही याला दुजोरा देत तोडीस तोड उत्तर देण्याची तयारी दर्शवली.
रणजितदादा आणि आमदार सचिन पाटील फलटणचा कायापालट करतील: राहुल निंबाळकर
राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक राहुल निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद रणजितदादांच्या पाठीशी आहे, त्यामुळे ते पुन्हा खासदार होणारच आहेत. रणजितसिंह, आमदार सचिन पाटील आणि समशेरदादा ही त्रिमूर्ती फलटणचा विकास करून दाखवेल,” असे त्यांनी सांगितले.
बदनामी थांबवा आणि पराभव स्वीकारा: नगरसेवकांचा सूर
नगरसेवक सचिन अहिवळे यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षांवर शिंतोडे उडवण्याच्या प्रकाराचा निषेध केला, तर संदीप चोरमले यांनी अनिकेतराजे हे नेहमीच चुकीचा ‘नरेटिव्ह’ सेट करण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका केली. “फलटणकरांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे,” असे चोरमले म्हणाले. माजी नगरसेवक सनी अहिवळे यांनीही फलटणमध्ये परिवर्तन झाले असून इथून पुढे विकासावरच चर्चा व्हावी, वैयक्तिक आणि चुकीचे वक्तव्य सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला.
या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजप-राष्ट्रवादीच्या वतीने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील सर्वच पदाधिकाऱ्यांनी श्रीमंत अनिकेतराजे यांच्यावर टीकेची झोड उठवत फलटणमधील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापवले आहे.
