नातेपुते येथील ‘महा किड्स’ स्कूलमध्ये रंगली स्पर्धा; तीन जिल्ह्यांतील ६० स्पर्धकांमध्ये फलटणचे वर्चस्व
। लोकजागर । फलटण/नातेपुते । दि. १५ जानेवारी २०२६ ।
स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त ‘महा किड्स सी.बी.एस.ई. स्कूल’, नातेपुते येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत फलटणच्या विद्यार्थिनींनी आपल्या अमोघ वक्तृत्वाने प्रथम क्रमांकावर मोहर उमटवली आहे. लहान गटात श्रीमंत शिवाजीराजे सी.बी.एस.ई. स्कूल फलटणची अद्विका विशाल फरांदे हिने, तर मोठ्या गटात जावली (ता. फलटण) येथील राजनंदिनी विठ्ठल पडर हिने प्रथम क्रमांक पटकावून फलटणचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले आहे.
अटीतटीच्या स्पर्धेत बाजी
या राज्यस्तरीय स्पर्धेचे हे पहिलेच वर्ष होते, ज्यात सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ६० स्पर्धक सहभागी झाले होते. इंग्रजी, मराठी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये ही स्पर्धा पार पडली. स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर आणि राजमाता जिजाऊ या विषयांवर स्पर्धकांनी आपले विचार मांडले. तिन्ही भाषांना समान महत्त्व देत, विषयाची मांडणी आणि प्रभावी सादरीकरण करणाऱ्या वक्त्यांची निवड करण्यात आली.
विजयी उमेदवारांचा तपशील:
- लहान गट (मराठी): अद्विका विशाल फरांदे (श्रीमंत शिवाजीराजे स्कूल, फलटण) – प्रथम क्रमांक.
- मोठा गट (मराठी): राजनंदिनी विठ्ठल पडर (जावली, फलटण) – प्रथम क्रमांक.
विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी, रोख रक्कम आणि प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. लहान गटात द्वितीय क्रमांक तुषार भुजबळ व तृतीय देवांश गोरे यांनी पटकावला, तर मोठ्या गटात द्वितीय शिवानी बोडरे आणि तृतीय क्रमांक आरुष गांधी यांनी मिळवला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमासाठी फोंडशिरसचे सरपंच पोपट बोराटे, संस्थेचे अध्यक्ष ॲड. शिवशंकर पांढरे, ॲड. विशाल फरांदे, रत्नत्रय स्कूलचे प्राचार्य दैवत वाघमोडे आणि संचालिका निशाताई सरगर उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात ॲड. शिवशंकर पांढरे यांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवणे आणि वाचन संस्कृती जपण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल साळुंखे यांनी केले. फलटणच्या या कन्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
