मराठी शाळांच्या चकचकाटापेक्षा त्यातील ज्ञान मोलाचे; ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचे प्रतिपादन

फलटणमध्ये ३० वे विभागीय व १३ वे स्व. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचा दिमाखात शुभारंभ

। लोकजागर । फलटण । दि. १६ जानेवारी २०२६ ।

इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा देखण्या आणि आधुनिक चेहऱ्याच्या असतात हे खरे आहे; पण त्या चकचकाटाला न भुलता खरेखुरे ज्ञान मराठी माध्यमांच्या शाळेत मिळते. त्यांच्यामध्ये भवितव्य लपले असून त्या शाळा टिकल्या पाहिजेत, यासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी व्यक्त केले. फलटण येथे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, फलटण शाखा आयोजित श्री सद्गुरू प्रतिष्ठान फलटण व श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या सहकार्याने श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मोत्सव वर्षानिमित्त समस्त वारकरी संप्रदायास समर्पित ३० वे विभागीय मराठी साहित्य संमेलन व १३ वे स्व. यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकलूजच्या ज्ञानाई गुरुकुलचे ह.भ.प. सुरेश महाराज शिंदे होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुणेचे अध्यक्ष मिलिंद जोशी, मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, मसाप सासवड शाखेचे अध्यक्ष रावसाहेब पवार, नगरसेविका रूपालीताई सस्ते, स्वागताध्यक्ष दिलीपसिंह भोसले, कार्याध्यक्ष डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके व संयोजक रवींद्र बेडकिहाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, आजचे युवक-युवती मोठ्या ताकतीने कथा कादंबऱ्या लिहीत आहेत, परंतु त्यांच्या ‘आरंभ शूर’ कादंबऱ्या शेवटच्या ४० टक्क्यांमध्ये आपला जादू हरवून बसत आहेत. एकदा कादंबरी सुचल्यानंतर तिच्या आरपार गेले पाहिजे आणि त्या व्यक्तिरेखेच्या खोलवर गेले पाहिजे, त्यातूनच तुम्ही उत्तम लेखन करू शकता. कादंबरीचा शेवट कसा असावा, तर ज्या पद्धतीने शिल्पकार मूर्तीमध्ये जीव येत नाही तोपर्यंत ती घडवत असतो, त्याप्रमाणे आजच्या युवा साहित्यिकांनी काम करणे गरजेचे असून तेवढ्याच निर्धाराने पुढे आले पाहिजे, तरच त्यांचे साहित्य समाजाला रुचेल असा सल्ला त्यांनी युवकांना दिला. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी तीन-चार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, ज्या गेल्या २५-३० वर्षांतील सर्वात जास्त होत्या. जो शेतकरी हाडाची काडे करतो, ज्याने शुगर फॅक्टरी उभी करण्यास मदत केली, तो तिथेच राहिला आणि दारिद्र्यात जगतोय. आपण कोरोना सारख्या महाभयंकर रोगाला पळवून लावले, परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्येसारख्या रोगाला हटवू शकलो नाही. हा पराभव जसा लागेबांध्यांचा आहे, तसा प्रशासक आणि साहित्यिकांचाही आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात अशा आत्महत्या झाल्या असत्या, तर सह्याद्रीची छाती करणारा हा राजकारणी पुरुष एकही दिवस सुखाने जगला नसता. या प्रश्नाचा लेखक, कवी, कादंबरीकार आणि नाटककार यांनी गांभीर्याने विचार करून त्यांच्या जीवनामध्ये स्वराज्याची पहाट कशी निर्माण होईल हे पाहिले पाहिजे. मराठी भाषा अतिशय प्रगत असून तिचे वैभव आपण जपले पाहिजे. गेल्या ५० वर्षांतील ९८ टक्के शास्त्रज्ञ मराठी शाळेत शिकलेले आहेत आणि जगातील ९० टक्के नोबेल विजेते लेखक मातृभाषेतून मोठे झाले आहेत, त्यामुळे मराठी भाषेला प्रतिष्ठा निर्माण झाली पाहिजे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी मिलिंद जोशी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आहेत. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून त्यांच्या स्मृतीचा जागर या संमेलनातून होत असून, यशवंतरावांच्या विचारांचा जागर करणारे हे महाराष्ट्रातील एकमेव संमेलन आहे. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावत असून राजकारणातील भाषेचा स्तर घसरत चालला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तिचा जबाबदारीने वापर करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे, याचा विस्मरण त्यांनी होऊ देऊ नये. सकारात्मकता आणि संवेदनशीलता काय असते हे यशवंतराव चव्हाण दाम्पत्याने महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असल्याचे आपण ऐकत आलोय, पण विद्यमान घटना पाहता ही केवळ अफवाच आहे की काय असा विचार मनात येतो, याचे गांभीर्याने चिंतन होणे गरजेचे आहे. यशवंतरावांनी राजकारण करत असताना साहित्य संस्कृतीला बळ दिले. सहकार क्षेत्र जर साहित्याच्या पाठीशी उभे राहिले तर या क्षेत्राला भरभराटीचे दिवस येऊ शकतात. सहकार आणि साहित्य ही दोन क्षेत्रे एकमेकांच्या हातात हात घालून पुढे गेली तर महाराष्ट्राला नवी दिशा निश्चित मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संमेलनाचे अध्यक्ष सुरेश महाराज सुळ यांनी गौरवौद्गार काढले की, साहित्य संमेलन म्हणजे अनेकांनी एकत्र येऊन करावयाची विचाराची यात्रा आहे, केवळ जत्रा नाही. संतांच्या परंपरेमुळे आजही महाराष्ट्र सुरक्षित आहे आणि हे संमेलन माऊलींच्या चरणी समर्पित झाल्यामुळे याला सोन्याचा सुगंध प्राप्त झाला आहे. कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे यांना यशवंतराव चव्हाण साहित्यिक गौरव पुरस्कार, कडूभाऊ छगन काळे यांना यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्कार, सौ. वेणूताई यशवंतराव चव्हाण सामाजिक कृतज्ञता पुरस्कार कार्यवाह सुनिताराजे पवार यांना, तर सौ. सुलेखा शिंदे सामाजिक कृतज्ञता पुरस्कार फलटणच्या इंदिरा महिला सहकारी संस्थेला प्रदान करण्यात आला. यावेळी महादेवराव गुंजवटे, ताराचंद्र आवळे, संदीप जगताप, अमर शेंडे यांनी मानपत्राचे वाचन केले. दिलीपसिंह भोसले यांनी स्वागत केले, डॉ. सचिन सूर्यवंशी बेडके यांनी प्रास्ताविक केले, तर रवींद्र बेडकिहाळ यांनी संमेलनाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. ताराचंद्र आवळे यांनी आभार मानले आणि आनंद पवार यांनी सूत्रसंचालन केले. रामकृष्ण महिला भजनी मंडळाच्या कार्यक्रमाने पहिल्या दिवसाची सांगता झाली.

Spread the love