गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करताना भारती पोळ. सोबत ताराचंद्र आवळे व मान्यवर.
कै. आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक सेवा मंडळाच्या इंदिरा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, दिवड येथे शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न.
। लोकजागर । फलटण । दि. 0५ फेब्रुवारी २०२५ ।
‘‘शिक्षण हे सर्वांगीण विकासाचे साधन असल्यामुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ग्रामीण भागामध्ये शिक्षण संस्था उभारून माजी आमदार स्व. सदाशिवराव पोळ यांनी शिक्षणाची दारे खुले केली. गुणवत्ता व सर्वांगीण विकास याचा ध्यास घेऊन काम करणारे गुरुजन व संस्थेची ध्येय धोरणे यामुळेच विद्यार्थी अद्यावत ज्ञान घेत असलेचे येथे दिसून येतात. यातून गुणवंत विद्यार्थी घडतात व हे गुणवंत विद्यार्थी ही शाळेची संपत्ती असते’’, असे मत माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे यांनी व्यक्त केले.
दिवड, ता. माण येथे कै. आबासाहेब पोळ शिक्षण प्रसारक सेवा मंडळ मार्डीचे इंदिरा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे शुभचिंतन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात ताराचंद्र आवळे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ. भारती पोळ होत्या. तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय वाघ, तुपे सर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
ताराचंद्र आवळे पुढे म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी स्पर्धेत टिकून राहिले पाहिजे व आपल्या शाळेचा, गावाचा नावलौकिक वाढवला पाहिजे. कोणताच माणूस एका दिवसात मोठा होत नाही तर त्यासाठी परिश्रम कष्ट व योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे. जगामध्ये जी श्रेष्ठ माणसे घडलेले आहेत ती त्यांच्या कर्तुत्वाने व अभ्यासाने पुढे गेलेली आहेत. अभ्यास हा माणसाला तारक असतो त्यामुळे दैनंदिन अभ्यास करून व शिक्षकांची आज्ञा पाळून आपल्या जीवनास आकार घेणे ही काळाची गरज आहे. स्वामी विवेकानंदांचे विचार आचरणात आणले तर जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. मनामध्ये तीव्र इच्छा असेल तर नेपोलियन बोनापार्ट सुद्धा होता येते फक्त मनात जिद्द असली पाहिजे.’’
कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. भारती पोळ म्हणाल्या, ‘‘शिक्षकांनी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून अध्यापन केल्यास विद्यार्थीही तेवढ्याच ताकतीचा निर्माण होतो. विद्यार्थ्यांनी योग्य वयात योग्य ज्ञान घेतले पाहिजे. आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे हे निश्चित केले तर निश्चितच यश सहज मिळते. आपण योग्य वयात आपल्या करिअरच्या वाटा शोधल्या पाहिजेत. समाजात आज जी मोठी माणसे झालेली दिसतात ती एका दिवसात न होता त्यामागे त्यांचा त्याग, कष्ट, जिद्द मेहनत असते. त्यामुळे आपणही त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी झाले पाहिजे.’’
यावेळी कबड्डी, कुस्ती, खो – खो, थ्रोबॉल, टेनिक्वाईट तसेच विविध वैयक्तिक क्रीडा प्रकारातील तालुका जिल्हा विभाग व राज्य स्तरावरील यशस्वी खेळाडूंना प्रमाणपत्र व ट्रॉफी, मेडल देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी शाळेप्रती आपल्या सद्भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अहवाल वाचन व स्वागत मुख्याध्यापक एस. बी. गोरे यांनी केले. सूत्रसंचालन घोसपूरकर मॅडम, शिंदे मॅडम यांनी केले. आभार एम. के. काटकर यांनी मानले.
यावेळी दिवड, दीडवाघवाडी, मसाईवाडी, पंतवस्ती, ढाकणी परिसरातील शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.