मुधोजी महाविद्यालयात भरारी पथकाने भेट दिली त्याप्रसंगी नायब तहसिलदार अभिजीत सोनवणे व इतर.
। लोकजागर । फलटण । दि. ११ फेब्रुवारी २०२५ ।
फलटण तालुक्यात मंगळवार दिनांक ११ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या बारावीच्या आणि दहावीच्या परीक्षेसाठी एकूण १२ केंद्र असणार असून कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी ३ भरारी पथकासह १२ बैठे पथके सज्ज केली आहेत, अशी माहिती फलटणचे तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.

दिनांक ११ फेब्रुवारी २०२५ रोजी बारावीचा पहिला पेपर विषय इंग्रजी या परीक्षेवेळी सर्व भरारी पथकांनी परीक्षा केंद्रांना अचानक भेटी दिल्या असून सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत सुरु झाल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी सातारा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सातारा यांनी दिनांक ११ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकार्यांची एकत्रित बैठक घेऊन सर्वांना आपली जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्याचे निर्देश दिले. त्यानुसार फलटणचे नवनियुक्त प्रांताधिकारी विकास व्यवहारे यांचे नियोजन आणि कुशल मार्गदर्शनाखाली फलटण तालुका महसूल, पोलिस, ग्रामविकास आणि शिक्षण विभाग कॉपी मुक्त परीक्षांसाठी एकत्रित कामकाज करत आहे, असेही डॉ. अभिजीत जाधव यांनी नमूद केले.