। लोकजागर । मुंबई । दि. १३ फेब्रुवारी २०२५ ।
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे ‘क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार’ योजना राबवण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या शासन निर्णयानुसार विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, आध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तींना शासनाकडून ‘क्रांतीवीर राजे उमाजी नाईक पुरस्कार’ देवून गौरविण्यात येणार आहे.
विमुक्त जाती व भटक्या जमातीसाठी कार्य करणारे समाजसेवक, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, आध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक अशा व्यक्तींसाठी विभागस्तरावर ७ व राज्य स्तरावर १ पुरस्कार देण्यात येणार असून संस्थांसाठी राज्य स्तरावर दरवर्षी १ पुरस्कार देण्यात येणार आहे. यामधील विभागस्तरावरील पुरस्कार विजेत्यास रु. २५ हजार तर राज्य स्तरावरील पुरस्कार विजेत्यास रु. ५१ हजार पुरस्काराची रक्कम असणार आहे.

या योजनेबाबतचा सविस्तर शासन निर्णय क्र. भविजा-2023/प्र.क्र.27/योजना-3 हा दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला असून यामध्ये पुरस्कार योजनेविषयीचा तपशील नमूद करण्यात आला आहे.