प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर काॅलेज, फलटणमध्ये निरोप समारंभ संपन्न
जग क्षणाक्षणाला झपाट्याने पुढे जात आहे आणि या बदलत्या काळात जर टिकून राहायचे असेल तर विद्यार्थ्यांनी जगातील घडणा-या बदलांचा स्वीकार करून स्वतःलाही वेळोवेळी अपडेट करत राहिले पाहिजे, असे मत “आरंभ है प्रचंड”या प्रेरणादायी पुस्तकाचे लेखक व प्रेरणादायी व्याख्याते सचिन गोसावी यांनी प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर काॅलेज, फलटण येथे इयत्ता १० वी व १२ वीच्या निरोप समारंभावेळी व्यक्त केले. प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. विद्यार्थ्यांना परिक्षेत आत्मविश्वास निर्माण व्हावा यासाठी या सचिन गोसावी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पत्रकार तथा प्राध्यापक सतीश जंगम हे उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ.संध्या गायकवाड, प्राचार्य अमित सस्ते, पर्यवेक्षक महेंद्र कातुरे,सुजाता गायकवाड तसेच सर्व शिक्षक वृंद व पालकवर्ग मोठ्या उत्साहाने उपस्थित होता.

सध्या मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये नैराश्य, चिडचिडेपणा व मेंदूला बधिरपणा येत असून यामुळे आत्महत्येचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. युवकांचे सोशल मीडियावर तासनतास वाया जात असल्याने वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. अनेकांचा स्क्रिनटाईम वाढल्याने त्यांचा लाईफटाईम कमी होऊ लागला आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून A.I. (Artificial Intelligence) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रूपाने आलेल्या चौथ्या औद्योगिक क्रांतीचे हसतमुखाने स्वागत केले पाहिजे. तसेच स्वतःच्या उज्वल भविष्यासाठी उपयुक्त असणारी पुस्तके वाचली पाहिजेत. कारण वाचनाने माणूस आणि त्याची विचारशक्ती व्यापक बनते.जगातील यशस्वी असणारी माणसं ही उत्तम वाचक असतात, असेही सचिन गोसावी यांनी सांगितले.