नवी दिल्लीत ‘लोकजागर’ विशेषांकाचे प्रकाशनअभिमानास्पद : खा.शरद पवार यांचे गौरवोद्गार

नवी दिल्ली येथे ‘लोकजागर’ च्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विशेषांकाचे प्रकाशन करताना खा. शरद पवार. सोबत रविंद्र बेडकिहाळ, सौ. अलका बेडकिहाळ, सौ. विद्या पारखे, गजानन पारखे.

। लोकजागर । फलटण । दि. २५ फेब्रुवारी २०२५ ।

‘‘महाराष्ट्रातून प्रकाशित होणार्‍या साप्ताहिक ‘लोकजागर’ने 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी संग्राह्य असा साहित्य संमेलन विशेषांक प्रसिद्ध केला हे अभिमानास्पद आहे. त्यासाठी या वृत्तपत्राचे संस्थापक रविंद्र बेडकिहाळ यांचे परिश्रम कौतुकास्पद आहेत’’, असे विचार 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी या विशेषांकाचे प्रकाशन करताना व्यक्त केले. यावेळी ‘लोकजागर’च्या प्रकाशक सौ. अलका बेडकिहाळ, सौ. विद्या पारखे, गजानन पारखे उपस्थित होते.

‘‘सा. लोकजागर हे फलटण, जि. सातारा येथून गेली 45 वर्षे नियमित प्रकाशित होत आहे. अनेक साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांप्रसंगी ‘लोकजागर’चा विशेषांक प्रकाशित होत असतो. यावेळी एव्हढ्या लांब नवी दिल्लीमध्ये येऊन ‘लोकजागर’चा विशेषांक प्रकाशित झाला. अशा प्रकारचे प्रकाशन करणारे हे महाराष्ट्रातील एकमेव लघुवृत्तपत्र आहे’’, अशा प्रतिक्रिया भारती विद्यापीठाचे कुलती डॉ. शिवाजीराव कदम, तसेच भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्‍वजीत कदम, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. महादेव सगरे यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, परिषद कोषाध्यक्ष तथा शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य विनोद कुलकर्णी, म.सा.प.पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष राजन लाखे, संमेलनाचे संयोजक व ‘सरहद’ संस्थेचे प्रमुख संजय नहार, म.सा.प.पुणे कार्यवाह अ‍ॅड. प्रमोद आडकर, वि. दा. पिंगळे, अंजली कुलकर्णी, मृणाल कानिटकर, ए.बी.पी.माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार तानाजी कोलते, ‘चपराक’चे संपादक घनशाम पाटील, प्रसिद्ध कथाकथनकार प्रा. रविंद्र कोकरे, प्रसिद्ध लेखिका चंद्रलेखा बेलसरे, डॉ. राजेंद्र माने, भारती विद्यापीठाचे प्रशासन अधिकारी राजेंद्र मोहिते, भारती विद्यापीठ, नवी दिल्ली येथील प्राचार्य विल्सन अशा अनेक साहित्यिक रसिकांनी व्यक्त केल्या आहेत.

‘लोकजागर’ ने 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यानिमित्ताने प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे अवलोकन करताना भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ. डॉ. विश्‍वजीत कदम. सोबत रविंद्र बेडकिहाळ.

या अंकातील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा धावता इतिहास, सातारा जिल्ह्याचे या संमेलनातील योगदान, ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरील चरित्रात्मक 3 विशेष खंडांची माहिती, भारती विद्यापीठाचे साहित्य, कला, संस्कृतीमधील योगदान यावरील लेख विशेष वाचनीय असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.

रेल्वेतही साहित्य संमेलन आणि ‘लोकजागर’चे खास स्वागत
महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. रविंद्र कोकरे यांच्या नेतृत्त्वाखाली साहित्य संमेलनासाठी पुणे – दिल्ली, दिल्ली – पुणे या खास रेल्वेगाडीत अनेक साहित्यिकांनी कथा, कविता, गप्पा, गोष्टी, विनोदी किस्से, कविता वाचन व गायन, कीर्तन, प्रवचन, अभंग, ओव्या यातून एक स्वतंत्र अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनच भरविले होते. त्याला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जाताना 30 तास व येतानही 32 तास फक्त साहित्याचा गजर या गाडीत सुरु होता. विशेष म्हणजे ‘लोकजागर’चा साहित्य संमेलन विशेष अंक मिळविण्यासाठी व वाचण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.

भारती विद्यापीठाचे साहित्य संमेलनासाठी अन्नदान
भारती विद्यापीठाचे कार्यवाह आ.डॉ.विश्‍वजीत कदम व कुलपती डॉ.शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठाचे प्रशासन अधिकारी राजेंद्र मोहिते व नवी दिल्लीचे भारती विद्यापीठ अधिकारी व त्यांच्या सहकार्‍यांनी रात्रंदिवस परिश्रम घेवून साहित्य संमेलन स्थळी अतिशय उत्तम भोजन व्यवस्था केली होती. सुमारे साडेसात हजारचेवर साहित्यिक, रसिक, श्रोते यांनी या अन्नदानाचा आनंदाने लाभ घेतला. वाचक, रसिक यांनी भारती विद्यापीठाच्या या उत्तम सेवेबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले.

Spread the love