स्वारगेट बसस्थानकातील घटनेनंतर परिवहन विभागाला खडबडून जाग

प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करण्याचे निर्देश; महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याच्याही सूचना

। लोकजागर । मुंबई । दि. २७ फेब्रुवारी २०२५ ।

स्वारगेट बसस्थानकातील रिकाम्या बसमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर राज्य परिवहन विभागाला खडबडून जाग आली असून प्रत्येक बसस्थानक व आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करण्याचे तसेच बस स्थानकांवर महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवण्याच्या सूचना परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत. तसेच बसस्थानक व आगारांमध्ये असलेल्या निर्लेखित बसेस व परिवहन कार्यालयांकडून कारवाईमध्ये जप्त केलेल्या वाहनांचे १५ एप्रिलपर्यंत निष्कासन करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिल्या. बसस्थानकांमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षा विषयक आढावा बैठक अपर मुख्य सचिव (परिवहन) यांच्या दालनात झाली. बैठकीला परिवहन विभागाचे अपर मुख्य सचिव व एसटी महामंडळाचे अध्यक्ष संजय सेठी, परिवहन आयुक्त व एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय (प्रभारी) विवेक भीमनवार, सहसचिव राजेंद्र होळकर, एस टी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

बसस्थानक परिसरातील निर्लेखित बसेस निष्कासनासाठी विहित कालावधी निश्चित करुन १५ एप्रिलपर्यंत ही कार्यवाही पूर्ण करण्यात यावी. राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पद असून या रिक्त पदावर भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. याबाबत प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, राज्यभरात सर्वच एसटी बसस्थानके व आगारांमध्ये सीसीटीव्हीची ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत यंत्रणा उभारण्यात यावी. नवीन बसेसमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे. बसेसमध्ये ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्याचे काम गतीने पूर्ण करण्यात यावे. पोलिसांची मदतीने बसस्थानकात गस्त वाढवण्यात यावी, आगार व्यवस्थापक हे त्या आगाराचे पालक असल्यामुळे त्यांनी तेथील निवासस्थानामध्येच वास्तव्य करावे. जेणेकरून २४ तास त्यांच्या निरीक्षणाखाली आगाराचे व्यवस्थापन चालेल. याबरोबरच बसस्थानकावर काम करणाऱ्या प्रत्येक एसटी कर्मचाऱ्याला ओळखपत्र देण्यात यावे, जेणेकरून कर्मचारी असल्याचे भासवून प्रवाशांना कोणी लुबाडणार नाही.

बसस्थानक अथवा आगारांमध्ये आलेल्या प्रत्येक बसची नोंदणी सुरक्षा रक्षकाकडे होणे अत्यंत आवश्यक आहे. तसेच चालक – वाहक यांनी आगारात आणलेली बस सोडताना ती बंद असल्याची खात्री करावी. बसचे दरवाजे बंद करण्याची काळजी घ्यावी व साध्या बसेसमध्ये दरवाजासह खिडक्याही बंद असल्याची खात्री करावी. बस स्थानकांवर असलेल्या सुरक्षा रक्षकांनी परिसरात फिरणाऱ्या अनोळखी व्यक्तींवर लक्ष ठेवून त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, असे निर्देशही परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.

बसस्थानकांत स्वच्छतेबाबत कुठलीही तडजोड करण्यात येवू नये. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यात याव्यात. प्रत्येक बसस्थानकात महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी. ही स्वच्छतागृह प्रशस्त असावीत, ‘एसटी’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वच्छतेसंदर्भात वेळोवेळी आढावा घेत राहणे आवश्यक आहे, असे‍ निर्देश परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिले.

Spread the love