फलटणमध्ये श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे भक्तीमय वातावरणात स्वागत

श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे स्वागत करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर. सोबत रविंद्र बेडकिहाळ, संजय चोरमले व भक्तगण.

एक दिवसाच्या मुक्कामानंतर सोहळा आज वालचंदनगरकडे मार्गस्थ

। लोकजागर । फलटण । दि. २८ फेब्रुवारी २०२५ ।

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्यावतीने निघालेल्या श्री स्वामी समर्थ ‘पालखी पादुका परिक्रमेचे’ फलटण नगरीत मलठण येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात काल सायंकाळी भक्तीमय वातावरणात स्वागत करण्यात आले. शहरातील गजानन चौकातील श्री स्वामी समर्थ मंदिरातील एक दिवसाच्या मुक्कामानंतर हा पालखी सोहळा नातेपुते – वालचंदनगरकडे आज सकाळी मार्गस्थ झाला.

श्री स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे स्वागत करताना ज्येष्ठ पत्रकार श्री रविंद्र बेडकिहाळ, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, संजय घाडगे, सरतापे आण्णा, दत्तराज थोरात, तानाजी कराळे, राजाभाऊ निंबाळकर, महेश लवळे, गणेश घाडगे, अक्षय घाडगे व मलठण मधील स्वामी भक्त.

वाई येथून फलटणमध्ये आलेल्या या पालखी सोहळ्याचे व पालखीसोबत असलेले संजूकाका कुलकर्णी, कल्याणी मामा व वारकर्‍यांचे स्वागत सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सोमाशेठ जाधव यांच्यासह स्वामी भक्तांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

त्यानंतर टाळ, मृदुंग व वाद्यांच्या गजरात श्री स्वामी समर्थ मंदिर, मलठण येथून निघालेली पालखीची मिरवणूक श्री हरिबुवा महाराज मंदिर, पाचबत्ती चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, राजे उमाजी नाईक चौक, गजानन चौक, शंकर मार्केट, श्रीराम मंदिर मार्गे अहिल्यानगर (गजानन चौक) येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात रात्री 8 च्या सुमारास पोचली. या पालखी मिरवणूकीदरम्यान ठिकठिकाणी रांगोळी काढून, फटाक्यांच्या आतिषबाजीत फलटणकरांनी श्री स्वामी समर्थांच्या पादूकांचे दर्शन घेतले. या मिरवणूक सोहळ्यात महिला – पुरुष हातात भगवे ध्वज घेवून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अहिल्यानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर येथे आरती प्रसंगी उपस्थित भाविक.

पालखीचे मुक्काम स्थळी आगमन झाल्यानंतर आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आज सकाळी पालखी सोहळा नातेपुते, वालचंदनगरकडे मार्गस्थ झाला.

श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, फलटणचे प्रमुख संजय चोरमले यांच्या नेतृत्त्वात सेवेकर्‍यांकडून या सोहळ्याचे यशस्वी नियोजन करण्यात आले.

Spread the love