राजे गटाचे राहुल निंबाळकर यांचा कार्यकर्त्यांसह अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
। लोकजागर । फलटण । दि. २ मार्च २०२५ ।
‘‘फलटण शहरात परिवर्तनाची लाट सुरु झाली आहे. श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली आपल्याला राष्ट्रवादीचे चांगले संघटन उभारायचे आहे. अजितदादांच्या नेतृत्त्वात आम्ही तालुक्याचा विकास करण्यात मागे राहणार नाही हा विश्वास जनतेमध्ये असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये युवकांचा प्रवेश होत आहे. 30 वर्षे इथं गटा-तटाचं राजकारण केलं जात होतं, पक्षाचं राजकारण केल जात नव्हतं. त्यामुळे ३० वर्षात इथं राष्ट्रवादीच कार्यालयही झालेलं नव्हतं. मात्र आता फलटण तालुक्यात राष्ट्रवादी पूर्वीपेक्षा अधिक बळकट होईल’’, असा विश्वास आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केला.
राजे गटाचे कार्यकर्ते राहुल निंबाळकर यांनी आ.सचिन पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) मध्ये प्रवेश केला. त्यावेळी आ. सचिन पाटील बोलत होते.

‘‘राहुल निंबाळकर यांनी फलटण नगरपरिषदेच्या माध्यमातून यापूर्वी चांगले काम केलेले आहे. त्यामुळेच त्यांना आज श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत सामावून घेतलेले आहे’’, असेही आ. सचिन पाटील यांनी यावेळी स्पष्ट करुन ‘‘रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचीही ताकद आमच्या पाठीशी आहे. महायुतीचं सरकार राज्याप्रमाणे फलटण तालुक्यातही ताकदीने काम करेल’’, असेही आ. सचिन पाटील यांनी यावेळी नमूद केले.
श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर म्हणाले, ‘‘राहुल निंबाळकर यांच्या रुपाने राष्ट्रवादीला फलटण शहरात मोठी ताकद मिळाली आहे. आगामी काळात राष्ट्रवादीच्या माध्यमातून फलटण शहरात राहुल निंबाळकर सक्रीय काम करतील. त्यांना सर्वोतोपरी ताकद आम्ही देणार आहोत.’