मराठीच्या संवर्धनासाठी मराठीतून लेखन, वाचन व विचारांचे आदानप्रदान होणे गरजेचे : अजित जाधव

सुजन फाऊंडेशनचा मराठी भाषा गौरव दिनी पुस्तक वाटपाचा उपक्रम

। लोकजागर । फलटण । दि. ०४ मार्च २०२५ ।

‘‘आधुनिक युगात मोबाईल, संगणक याद्वारे केलेल्या वाचनापेक्षा लिखित पुस्तकांमधील वाचन हे कायमस्वरुपी स्मरणात राहते. मराठी भाषेचे संवर्धन करायचे असेल तर मराठीतून लेखन, वाचन व विचारांचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे’’, असे मत सुजन फाऊंडेशनचे प्रमुख अजित जाधव यांनी व्यक्त केले.

सुजन फाउंडेशनच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त मराठी भाषा गौरव दिनी सावित्रीबाई फुले अध्यापिका विद्यालय, नायगाव (ता. खंडाळा) या विद्यालयाला व प्रशिक्षणार्थीना सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, छ. शिवाजी महाराज, सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यावर आधारित वाचनीय पुस्तके भेट दिली. त्याप्रसंगी ते बोलत होते.

‘‘तुम्ही भावी शिक्षिका या नात्याने भाषा जतन करण्याचे व भाषेचा प्रसार, प्रचाराचे काम कराल’’, असेही यावेळी अजित जाधव यांनी विद्यालयातील प्रशिक्षणार्थ्यांना उद्देशून सांगितले.

याप्रसंगी पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते रोहिदास शिंदे, भिडे वाडा पहिली मुलींची शाळा व फुले दांपत्य विचार प्रसारक प्रशांत फुले व कॉलेजच्या प्राचार्या सौ. शर्मिला नेवसे उपस्थित होत्या. भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अविनाश वाडकर व सचिव कृष्णाजी झगडे यांनी प्रशिक्षणार्थीना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. एम.आर. नेवसे यांनी केले.

Spread the love