। लोकजागर । फलटण । दि. ०४ मार्च २०२५ ।
निरा उजवा कालव्याच्या पाणी वाटपाबाबत आम्ही राजकारण आणत आहोत,अशी उलट सुलट चर्चा काही लोक करत आहेत.खरं तर अशी चर्चा करणाऱ्यांची आणि रामराजे यांचा पाणी प्रश्नाबाबत काही अभ्यास नाही असे भाष्य करणाऱ्यांच्या ज्ञानाची मला कीव येते असा घणाघात सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उद्देशून केला.
निरा उजवा कालव्याच्या पाणी वाटपाबाबत गेली काही दिवस फलटण तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. नुकत्याच झालेल्या कालवा समितीच्या बैठकीमध्ये निरा उजवा कालव्यातून अधिकचे पाणी माळशिरस आणि सांगोला तालुक्यातून मागितले गेले होते. याला आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्यातून विरोध करण्यात आला होता. सदरची बैठक पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार व जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन झाल्यानंतर पाणी वाटपात कुठलाही बदल केला जाणार नाही,असे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर करून फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला होता.त्यानंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना फलटणचे पाणी कुणालाही जाणार नव्हते, रामराजे लोकांच्यात याबाबत चुकीचा नॅरेटिव्ह सेट करुन बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत.अशी टीका केली होती. त्याला प्रतिउत्तरा दाखल आयोजित पत्रकार परिषदेत संजीवराजे नाईक निंबाळकर बोलत होते.

संजीवराजे यावेळी पुढे म्हणाले, निरा उजवा कालव्यातून पाण्याची जादा मागणी जर झाली निश्चितपणे याचा परिणाम प्रथेप्रमाणे होणाऱ्या पाणी वाटपावर होणारच आहे.याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारणच नाही.मात्र याला जर कोणी फाटे फोडत असेल तर त्यांच्या अकलेचे तारे ते तोडत आहेत. आहे या पाण्यात कुणीतरी वाटा मागितला तर ते ज्यांचं आहे त्यांचा तोटा होणार आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे आ.रामराजे यांनी प्रथेप्रमाणेच पाणी वाटप व्हावे ही भूमिका घेतली.याच्यातून काही मंडळींनी त्यांचे वेगवेगळे अर्थ काढून राजकीय भाषा सुरु केली.माजी खासदार याविषयी बोलताना आ. रामराजे यांचा पाणी प्रश्नाबाबत काही अभ्यास नाही असे त्यांनी भाष्य केलं. अशा प्रकारचे माध्य करणारे हे एकमेव माजी खासदार असावेत, असा टोलाही संजीवराजे यांनी लगावला.
आ.रामराजे यांचा कृष्णा खोऱ्याचा किती अभ्यास आहे हे संपूर्ण राज्याला माहिती आहे. माजी खासदारांची या वक्तव्याबदल मला कीव येते. निरा देवघर धरण झाल त्याच्या लाभ क्षेत्रातच त्याचं वाटप व्हावं,एवढीच आमची मागणी आहे. कृष्णा खोऱ्याची स्थापना आणि त्यातून जी जी धरणं करण्याची आवश्यकता होती, ते पाणी आडवण्यामध्ये खऱ्या अर्थाने कुणाला यश मिळालं असेल तर,रामराजे यांनाच.त्यांचा याबाबत गाडा अभ्यास आहे, असेही संजीवराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.
बंद नलिकेद्वारे पाणी देण्याबाबतचा विचारही रामराजे हे विधानपरिषदेचे सभापती असतानाच झाला होता. शिवाय पाईपलाईनद्वारे पाणी देताना जी पाण्याची बचत होणार आहे त्या पाण्यावर ही निरा देवधर प्रकल्पग्रस्तांचाच हक्क आहे. सद्यस्थितीत निरा देवपर लाभ क्षेत्रातील ५८ टक्के भागालाच हे पाणी मिळतं. त्यामुळे उर्वरित ४२ टक्के क्षेत्राला वाचणारं पाणी मिळावं, अशी आमची ठाम भूमिका आणि मागणी आहे असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी आवर्जून अधोरेखित केले.