कोळकीची नगरपालिकेकडे वाटचाल करुया : रणजितसिंह नाईक निंबाळकर

राजेगटाला सोडचिठ्ठी देत कोळकीतल्या दिग्गजांचा भाजपमध्ये प्रवेश

। लोकजागर । फलटण । दि. १७ मार्च २०२५ ।

‘‘कोळकीतल्या ८ ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. कोळकीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्याचा मी त्यांना शब्द दिलेला आहे. कोळकीचा सर्वांगीण विकास करुन कोळकी ग्रामपंचायतीची नगरपालिका करण्याकडे आपण वाटचाल करुया. यासाठी गरज पडल्यास शेजारच्या गावांचा समावेश यामध्ये करता येईल’’, असे सुतोवाच माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

राजेगटाला सोडचिठ्ठी देत कोळकी पंचायत समिती गणाचे माजी सदस्य सचिन रणवरे यांच्यासह कोळकी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच विकास नाळे, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष पैलवान संजय देशमुख, युवा नेते किरण जाधव, सागर चव्हाण, सागर काकडे व इतर सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते.

रणजितसिंह नाईक निंबाळकर पुढे म्हणाले ‘‘कोळकी ही फलटण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. कोळकीमध्ये 25 हजारच्या आसपास लोकवस्ती आहे. भविष्यात नगरपंचायत होऊ शकणार्‍या कोळकीतल्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्‍नाकडेसुद्धा माजी लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही. इथला स्मशानभूमीचा प्रश्‍न ते सोडवू शकले नाहीत. कोळकीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनाही आपण विनंती केली आहे. नगरपंचायत होत असताना त्यांचीच एन.ओ.सी. आपल्याला घ्यावी लागणार आहे. नगरपंचायत होत असताना भविष्यात कोळकी नगरपालिका करण्याच्यादृष्टीने आपण वाटचाल करुयात.’’

‘‘येणार्‍या भविष्यात जयकुमार गोरेंची प्रचंड मोठी ताकद फलटणला मदत करण्यासाठी आहे. आमदार सचिन पाटीलही धडाडीने फलटणचे प्रश्‍न मार्गी लावत आहेत, त्यामुळे फलटणचा विकास आता कुणी थांबवू शकत नाही’’, असा ठाम विश्‍वासही यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love