कष्टकऱ्यांचा सन्मान करण्याचा अनुबंध कला मंडळाचा उपक्रम स्तुत्य : आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

| लोकजागर | फलटण | दि. २२ मे २०२५ |

वर्षानुवर्षे अहोरात्र कष्ट उपसून आपला चरितार्थ चालविण्याबरोबर एक प्रकारे आगळी वेगळी समाजसेवा करणाऱ्यांचा सन्मान करुन छोटीशी आर्थिक मदत करण्याचा अनुबंध कला मंडळाचा उपक्रम स्तुत्य आहे, मात्र त्यांची आर्थिक कोंडी सोडविण्यासाठी योजना तयार करण्याची आवश्यकता असून यासाठी स्वतः पुढाकार घेणार असल्याचे सुतोवाच महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

समाजात ५० वर्षाहून अधिककाळ उन्हापावसात थंडी वाऱ्याची पर्वा न करता अखंडित कष्ट करत राहणाऱ्या कष्टकऱ्यांना वंदन व त्यांचा सन्मान हा आगळा वेगळा उपक्रम गेली ३ वर्षे अनुबंध कला मंडळ, फलटणच्या माध्यमातून अव्याहत सुरु असून यावर्षीच्या कार्यक्रमात आ. श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेन्ट स्कूलच्या नियामक मंडळ सदस्या सौ. संध्या गायकवाड विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.


आज सत्कार झालेले एक अंध धारकरी कामगार यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करणे शक्य असेल तर ते करुन देण्याची जबाबदारी घेण्याची घोषणा करताना सर्व अखंडित कष्ट करणाऱ्या कामगारांच्या सदैव पाठीशी राहुन त्यांना आवश्यक ती मदत करण्याची ग्वाही यावेळी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

अनुबंध कला मंडळाचा हा अनोखा कार्यक्रम आपल्याला जेंव्हा समजला त्यावेळी अनुबंध कला मंडळाच्या सर्व सदस्यांचे मला खूप कौतुक वाटले, ज्यांच्या कष्टावर आपला समाज उभा आहे आणि आपले लक्ष त्यांच्याकडे जात नाही अशा कामगारांचे कौतुक करण्याचे अनुबंध कला मंडळाला सुचले याबद्दल मंडळाचा खूप आदर आणि अभिमान वाटला असे सांगून एका शैक्षणिक संस्थेशी संबंधीत असल्याने असे आदर्शवत कार्यक्रम तरुण पिढीच्या समोर व्हावेत, त्यांनाही असे आदर्श बाणवण्याची इच्छा व्हावी असे वाटल्याचे यावेळी सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिंह कॉन्व्हेन्ट स्कूल व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी स्पष्ट केले.

सुवर्ण परिसर फौंडेशनच्या संचालिका पठाण मॅडम यांनी ही अनुबंध कला मंडळाच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करीत हा उपक्रम अखंडित सुरु रहावा अशी विनंती केली.

अबॅकस या गणिती शाखेच्या अध्यापिका सौ. कल्पना जाधव यांनी, असा वेगळा कार्यक्रम अनुबंध कला मंडळाला सुचतो आणि गेली ३ वर्षी हा उपक्रम ते अखंडित राबवित असल्याबद्दल त्यांचे कौतुक करताना हा उपक्रम अखंडित सुरु रहावा यासाठी सर्वांनी अनुबंध कला मंडळाला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अनुबंध कला मंडळाच्या या कार्यक्रमाचे स्वरुप पाहता पुढील वर्षापासून या कार्यक्रमाच्या दिवशी सन्मानार्थी कामगारांचे छायाचित्र व त्यांची संपूर्ण माहिती वृत्तपत्रात छापून सदर वृत्तपत्राच्या प्रति कार्यक्रमस्थळी मोफत उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमातील सन्मानार्थी राजेंद्र माने यांनी आपल्या चहा टपरीच्या व्यवसायातून ३ मुलींना उत्तम शिक्षण दिले, त्यांच्या या मुली आज नामांकित संस्थांमध्ये वरिष्ठ पदावर काम करीत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

डॉ. श्रीकांत करवा यांनी असा उपक्रम सुरु झाला याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केला, आपण प्रतिवर्षी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहात असल्याचे सांगून त्यांनी अनुबंध कला मंडळाला प्रोत्साहन दिले.

या कार्यक्रमात सौ. शुभांगी बोबडे यांनी आरंभ प्रार्थना व कार्यक्रम सांगता गीत गायले. नुकताच त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार घोषित झाला आहे, त्यांचा ही सत्कार आ. श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते करण्यात आला.
वर्षानुवर्षे आपण फलटण शहरात राहतो. येथे छोटी – मोठी कामे करणारे… कष्ट करणारे कामगार… कोणी चर्मकार, कोणी केश कर्तनकार, कोणी स्वच्छक, कोणी बर्फाचे गोळे विकणारा, कोणी धार लावणारा अशी अगदी साधीसुधी काम करणारी अनेक माणसे आपल्या गरजांना धावून येतात, गरजेच्यावेळी आपण त्यांच्याकडे जातो, काम करुन घेतो, पण नंतर हे सर्व कामगार आपल्या खिजगणतीत ही नसतात अशा उन्हा पावसात समाजासाठी कोणी ५० कोणी ६० कोणी ७० वर्षे वृद्धापकाळातही अखंडित कष्ट करत राहतात. समाज उभारणीसाठी त्यांचे योगदान सहजी कोणाच्या लक्षात येत नाही, असे अखंडित कष्ट करणारे वृद्ध कामगार अनुबंध कला मंडळाला दिसले… आणि वाटलं किती मोठे हे कष्ट… यांचे हे कष्ट अधोरेखित व्हायला हवे. त्यांचाही सन्मान, सत्कार करुन कृतार्थता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. त्यासाठीच अनुबंध कलामंडळाने साकारला हा उपक्रम असे सांगत अशा अखंडित कष्ट करत राहणाऱ्या १० कामगारांचा सत्कार शाल, पुष्पहार, मिठाई व अनुबंधकला मंडळातर्फे छोटीशी आर्थिक भेटचे पाकीट देऊन आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आल्याचे मंडळाचे अध्यक्ष बकुळ पराडकर यांनी निदर्शनास आणून दिले.

सन्मानित करण्यात आलेल्या या कष्टकऱ्यांमध्ये लक्ष्मण देशपांडे, वय वर्ष ६९, गेली ३५/४० वर्षे अखंडित पान टपरी व्यवसाय, करोना काळात मास्क विक्रीही केली, प्रकाश मोहिते, एम ए पर्यंत शिक्षण झाले आहे. नजरेने अधू असूनही चाकू, सुरी, कात्रीला धार लावण्याचे काम करतात, रत्नाकर कासार, वय ७४ वयाच्या१४ व्या वर्षापासून छोटी मोठी कामे करत राहतात.. १९८० साली बायपास होऊनही आज अखेर हॉटेलमध्ये कार्यरत, रोहिदास सोनवणे, वय वर्ष ६९.. ४०/५० वर्षापासून चप्पल दुरुस्ती, राजेंद्र विष्णू माने, वय वर्षे ६० वयाच्या २० व्या वर्षापासून चहा टपरी… गरिबांना मोफत चहा. ३ मुलींचे उत्तम शिक्षण करुन मोठ्या पदावर नोकऱ्या, श्रीमती सुगंधा जगताप, वय वर्ष ७० गावात झाडलोटीचे काम करतात, गुलाब इनामदार, वय ७६..बर्फाचे गोळे विकण्याचा व्यवसाय, हनिफ तांबोळी, वय वर्ष ६५ मुद्रण व्यवसायात छोटी मोठी कामे करतात बळवंत पाटील वय वर्षे ८० गावभर फिरुन पेरु विकण्याचं काम करतात, श्रीमती आशा दरेकर वय वर्षे ६०, धुण्या भांड्याचे काम करत असल्याचे यावेळी मंडळाने निदर्शनास आणून दिले.

अनुबंध कला मंडळातर्फे सांज दिवाळी, कराओके गायन स्पर्धा, करमणुकीचे, सामाजिक बांधिलकीचे, मदतीचा हात सारखे वृद्ध रुग्णांना मदत करणारे आणि देह दानासाठी जनजागृती करण्यासाठी कार्यक्रम हाती घेण्यात येत असल्याचे बकुळ पराडकर यांनी सांगितले.

डॉ. प्रसाद जोशी यांचे अनुबंध कला मंडळास सर्वतोपरी सहकार्य नेहमीच लाभत असल्याचे आवर्जून निदर्शनास आणून देत त्यांचे, गेली ३ वर्षे या कार्यक्रमासाठी वेळ देणारे आणि मार्गदर्शन करणारे आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सौ. जयश्री शिंदे, सौ. संध्या गायकवाड, पठाण मॅडम यांच्यासह कार्यक्रमास उपस्थित असलेल्या फलटणकरांचे यावेळी उस्मान शेख यांनी आभार मानले.

Spread the love