रामराजे हे टेक्निकली राष्ट्रवादीत : श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर

पत्रकार परिषदेत बोलताना श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर. सोबत आ. सचिन पाटील, राहुलभैय्या निंबाळकर.

राजाळे येथील पक्ष प्रवेशाचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही : आ. सचिन पाटील

। लोकजागर । फलटण । दिनांक १८ मे २०२५ ।

‘‘विधानसभेला ना. अजितदादा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जाहीर केलेले तिकीट नाकारून राजे गटाने अजित पवार यांचा मोठा अवमान केला आहे.आम्ही विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला आणि खर्‍या अर्थाने फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जीवंत ठेवली. रामराजे हे टेक्निकली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत परंतु विधान विधानसभेच्या निवडणुकीपासून त्यांनी राष्ट्रवादीच्या कोणत्याही कार्यक्रमाला हजेरी लावली नाही, अशी टीका फलटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केली. फलटण येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार सचिन पाटील, राहुलभैय्या निंबाळकर उपस्थित होते.

आधी दोन संस्थांबाबत खुलासा करावा; मगच आमच्या जिनिंगबाबत बोलावे

‘‘१९८० मध्ये फलटण पूर्व भागामध्ये कापसाचे पीक मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे दादाराजे यांनी त्या भागामध्ये तीन जिनिंग फॅक्टरी काढल्या होत्या. गेल्या पंधरा वर्षांपूर्वी बोंड आळी सारखा रोग कापसावर आल्याने कापसाचे पीक आपल्या भागातून नामशेष झाले. त्यामुळे कापसाच्या फॅक्टरी बंद पडल्या. तालुक्यात मुबलक दूध असतानाही फलटणचा दूध संघ का बंद पडला? हे आधी रामराजे यांनी सांगावे तसेच तालुक्यातील श्रीराम कारखान्याच्या सभासदांनी करोडो रुपयांचे ठेवी दिल्या तरीही तुम्ही कारखाना चालवायला का दिला? या दोन संस्थांचा खुलासा त्यांनी करावा आणि मगच आमच्या जिनिंग फॅक्टरीवरती बोलावे’’, असेही श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

कारखाना सभासदांचा राहण्यासाठी ताकतीने निवडणूक लढवणार

‘‘श्रीराम सहकारी साखर कारखान्यासाठी श्रीमंत मालोजीराजे, शिवाजीराजे, दादाराजे, स्व.हणमंतराव पवार आणि स्व.हणमंतराव पवार यांचे वडील यांनी आपापल्या पध्दतीने कष्ट घेतले आहेत. जवाहरने जुन्या मशिनरी आणून सभासदांवर 100 कोटी कर्ज लादण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कारखाना सभासदांचा आहे तो सभासदांचा राहिला पाहिजे यासाठी आम्ही पूर्ण ताकतीने निवडणूक लढवणार आहोत’’, असेही श्रीमंत शिवपरुराजे खर्डेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

पाणी कमी कसे होणार आहे हे त्यांनी स्पष्ट करावे

‘‘कालवा समितीच्या मीटिंगमध्ये मंत्री विखे पाटील यांनी कोणत्याही तालुक्याचा एक थेंब ही पाणी कमी होणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे फलटण पूर्व भागातील छत्तीस गावांचे नुकसान होणार नाही. वाढलेले पाणी कालवा समितीच्या विचारानेच वाटप केले जाईल असेही विखे पाटील यांनी सांगितले आहे. मग पाणी कसे कमी होणार आहे हे स्वतः रामराजे यांनीच स्पष्ट करावे’’, असेही श्रीमंत शिवरूपराजे यांनी सांगितले.

श्रीमंत रामराजेंनी वैयक्तीक पातळीवरची टीका टाळावी : आ. सचिन पाटील

यावेळी बोलताना आमदार सचिन पाटील यांनी सांगितले की, ‘‘आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि माजी आमदार दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत राजाळे येथे झालेल्या कार्यकत्यांच्या प्रवेशाचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांची राज्यात सत्ता येईल याची खात्री नव्हती म्हणून त्यांनी वेगळ्या पक्षाची भूमिका घेऊन विधानसभेची निवडणूक लढवली. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल आता प्रेम दाखवू नये. आमचे नेते रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर वैयक्तिक पातळीवरची टीका टाळावी. आमच्या नेत्यावर केलेली टीका आम्ही खपवून घेणार नाही. फलटणचे लोक आता महायुतीचे काम करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसह महायुतीतील सर्वच घटक पक्षांमध्ये प्रवेश होत आहेत’’, असेही आमदार सचिन पाटील यांनी स्पष्ट केले.

दिनांक २२ रोजी राष्ट्रवादीच्या सभासद नोंदणी अभियानाचा फलटणमध्ये प्रारंभ

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शनिवार दि. २२ मार्च रोजी मदत व पुनर्वसनमंत्री ना.मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांच्या उपस्थितीत सभासद नोंदणी अभियान सुरू करणार असल्याची माहिती यावेळी आ. सचिन पाटील यांनी दिली.

Spread the love