। लोकजागर । फलटण । दि. २१ मार्च २०२५ ।
‘‘कारखान्यावर प्रशासक म्हणून प्रांताधिकार्यांची नेमणूक झाल्यावर आता चिडून न जाता पारदर्शक निवडणूक पार पाडण्यासाठी, सभासदांना मतांचा अधिकार मिळावा आणि कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या प्रयत्नाला तुम्हीही साथ द्या. या प्रक्रियेत लोकशाही मार्गाने सहभागी व्हावा, यश सभासद ठरवतील’’, असा मार्मिक टोला भारतीय जनता पार्टीचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांनी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता लगावला आहे. श्रीराम कारखान्यावर प्रशासक नियुक्त झाल्याची माहिती माध्यमांना देताना अनुप शहा बोलत होते.

‘‘श्रीमंत मालोजीराजे, श्रीमंत शिवाजीराजे यांनी श्रीराम कारखाना सभासदांच्या मालकीचा रहावा म्हणून काम केलं. सत्ता आल्यानंतर कारखाना तुम्ही दुसर्याला चालवायला दिला. श्रीराम कारखान्याची निवडणूक पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. प्रशासक आला म्हणून तुम्ही चिडता कशाला? आमची प्रशासकावर कधीच दादागिरी नव्हती. आम्ही व आमचे नेते विचाराने शिक्षीत आहोत. अधिकार्यांबाबत तुम्हीच काय भाषा वापरता याचा विचार करा’’; असेही अनुप शहा यांनी यावेळी सांगितले.
बिघडलेल्या माणसांना दुरुस्त करण्याचा आमचा डिप्लोमा
पाण्यावर बोलायला पी.एचडी. लागत नाही वस्तू दुरुस्त करण्याचा डिप्लोमा लागतो अशा आशयाचा व्हॉटस्अॅप स्टेटसठेवून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लक्ष करणार्या आ. श्रीमंत रामराजे यांना याबाबत उत्तर देताना, ‘‘त्यांची माहिती चुकीची आहे. आमचा डिप्लोमा बिघडलेली यंत्र दुरुस्त करण्याचा नसून या तालुक्यात बिघडलेल्या माणसांना दुरुस्त करण्याचा आहे. आमच्या स्क्रु ड्रायव्हरने तालुक्याची बिघडलेली विकासाची घडी परत बसवण्यासाठी बिघडलेले स्क्रू आवळण्याचा प्रयत्न आम्ही करणारच आहोत’’, असेही अनुप शहा यांनी यावेळी सांगितले.
‘‘येणार्या निवडणूकीच्या काळात त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिलं जाईल. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवून जनतेने आम्हाला सत्ता दिली आहे. या सत्तेचा वापर सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवूनच केला जाईल’’, असे स्पष्ट करुन ‘‘श्रीराम कारखान्याच्या मयत सभासदांच्या वारसांनी सभासदत्वासाठी अर्ज करावेत; म्हणजे त्यांना मतदानाचा हक्क मिळवून देता येईल’’, असे आवाहनही यावेळी अनुप शहा यांनी केले.