। लोकजागर । फलटण । दि. ०४ एप्रिल २०२५ ।
येत्या काळात नीरा उजवा कालव्यातून शेतीसाठी कमी पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये पाण्याविषयी जनजागृती व्हावी आणि त्यांना त्यांच्या हक्काचे पाणी मिळावे यासाठी शनिवार, दिनांक ५ एप्रिल २०२५ रोजी गोखळी (ता.फलटण) येथील हनुमान मंदिरात लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे, डॉ. शिवाजीराव गावडे यांनी एका जाहीर निवेदनाद्वारे सांगितले आहे.

सदर निवेदनात डॉ. शिवाजीराव गावडे यांनी नमूद केले आहे की, आपल्या परिसरातील शेतकर्यांना येणार्या काळात नीरा उजव्या कालव्यातून शेतीसाठी कमी पाणी उपलब्ध होणार आहे. कारण, सध्या उपलब्ध असलेले नीरा-देवघर आणि गुंजवणी धरणाचे पाणी त्याच्या लाभक्षेत्रात जाणार आहे. यावर आपला हक्क नसला तरी गेले 15-20 वर्षे आपण हे पाणी वापरत होतो, पण आता ते मिळणार नाही. तसेच, नीरा नदीतील 7 टीएमसी पुराचे पाणी उजनी धरणात जाणार असून तेथून ते पाणी मराठवाड्याकडे वळवले जाणार आहे. त्यामुळे तेही पाणी कमी होणार आहे. देवघरच्या बंदिस्त नलिकांमुळे वाचणार्या पाण्याची इतर भागातील लोक मागणी करत आहेत, त्यामुळे त्या पाण्याचाही तुटवडा जाणवू शकतो. ही परिस्थिती लक्षात घेता, शनिवार, दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी गोखळी येथील हनुमान मंदिरामध्ये सकाळी 8 वाजलेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण करणार आहे.
सदर उपोषणादरम्यान, नीरा उजवा कालवा व नीरा नदीतील पाणीपुरवठ्याच्या संदर्भातील कागदपत्रे उपस्थित शेतकर्यांना दाखवून चर्चा केली जाईल. आपल्या परिसरातून बाहेर जाणार्या पाण्याचे परिणाम आणि त्यावर उपाययोजना यावर विचारमंथन होईल. आपले हक्काचे पाणी बारमाही मिळावे यासाठी पुढील दिशा ठरवली जाईल, असेही डॉ. शिवाजीराव गावडे यांनी नमूद केले आहे.
कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना तातडीने अंमलात आणावी, नीरा नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात याव्यात. प्रदूषणामुळे कॅन्सरसारखे आजार वाढण्याची शक्यता आहे, हे टाळण्यासाठी सरकारने पावले उचलावी या देखील आपल्या प्रमुख मागण्या असल्याचे निवेदनात सांगून हे आंदोलन पूर्णतः राजकारणविरहित आहे. हे उपोषण कोणत्याही सरकारविरोधी किंवा राजकीय हेतूने प्रेरित नाही. पाण्याविषयी जनजागृती व्हावी आणि शेतकर्यांचे हक्काचे पाणी मिळावे, हाच एकमेव उद्देश आहे. ज्यांना यासंबंधी माहिती आहे त्यांनी ती इतरांना सांगावी, आणि ज्यांना माहिती नाही त्यांना आम्ही योग्य ती माहिती देऊ, असेही डॉ. शिवाजीराव गावडे यांनी स्पष्ट केले आहे.