। लोकजागर । फलटण । दि. 14 जून 2025 ।
‘‘फलटणचे नातू या नात्याने आपण छत्रपती संभाजी महाराजांकडे पाहत असतो. मोठ्या भावनेने आणि श्रद्धेने हा पुतळा आपण बसवलेला आहे. त्यामुळे याठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार, अस्वच्छता होणार नाही याची काळजी सर्वांनी घेवून या संपूर्ण परिसराचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी’’, असे आवाहन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

फलटण शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण व लाईट व्यवस्था करण्याचा प्रारंभ आज श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी उपनगराध्यक्ष नितीन भोसले, सातारा जिल्हा अॅम्युचर खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब चोरमले, माजी नगरसेविका सौ. प्रगती कापसे, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, उद्योजक प्रमोद निंबाळकर, तुषार नाईक निंबाळकर, विशाल पवार, निजाम भाई आतार, प्राचार्य सागर निंबाळकर, माजी प्राचार्य सुधीर इंगळे, भाऊसाहेब कापसे, सनी शिंदे, अमरसिंह पिसाळ, निखिल डोंबे, पै. अभिजीत जानकर, प्रितसिंह खानविलकर, विजय लोंढे पाटील आदींसह कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

‘‘छत्रपती संभाजी महाराजांपासून स्फूर्ती मिळावी म्हणून पुतळा समिती स्थापन करुन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमच्या पुढाकारातून हा पुतळा बसवण्यात आला. या ठिकाणी लाईटची सोय लवकरच होणार आहे. हा परिसर स्वच्छ आणि सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच्या घटकेला पुतळा समितीकडून गरज असलेली सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. या संपूर्ण परिसराचं पावित्र्य राखण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध असलं पाहिजे. कुठलाही अनुचित प्रकार याठिकाणी होऊ नये याची जबाबदारी सर्वांनीच घ्यावी. पुतळ्यासमोरील भिंत पाडून या ठिकाणी आकर्षक सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याची परवानगी नगरपरिषदेकडून मिळाल्यानंतर लवकरच तेही काम पूर्ण होणार आहे’’, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी स्पष्ट केले.

