फलटणच्या श्रीराम विद्याभवन व आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयाचा उपक्रम
। लोकजागर । फलटण । दि. 02 जुलै 2025 ।
आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाच्या मार्गावर महात्मा एज्युकेशन सोसायटीचे श्रीराम विद्याभवन प्राथमिक शाळा आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय फलटणच्या विद्यार्थ्यांनी वेशभूषा परिधान करून महात्मा फुले चौक येथे विठ्ठल – रुक्मिणी दर्शन सोहळा सादर केला. हा दर्शन सोहळा वारकर्यांसह भाविक भक्तांना भावल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर ओसंडून वाहताना दिसत होता.

प्रारंभी या दर्शन सोहळयाचा शुभारंभ फलटणचे प्रसिध्द अस्थीरोगतज्ञ डॉ. प्रसाद जोशी व डॉ. सौ. प्राची जोशी यांनी सपत्नीक श्रीफळ वाढवून केला. यावेळी संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ, श्रीराम विद्याभवन शाळा समितीचे चेअरमन रविंद्र बर्गे, मुख्याध्यापक मनीष निंबाळकर (प्राथमिक), भिवा जगताप (माध्यमिक) आणि सर्व शिक्षक उपस्थित होते.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील प्रसाद मठपती याने विठ्ठलाचा आणि दिक्षा गायकवाड हिने रूक्मिणीची वेशभूषा करून शहरातील पालखी मार्गावर महात्मा फुले चौक येथे हा देखावा सादर केला. हा विठ्ठल – रुक्मिणी दर्शन सोहळा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. या सोहळयामुळे पालखीच्या रथापुढील आणि रथामागील दिंडयांतील वारकर्यांसह शहरातील भाविक भक्तांना वारीत साक्षात विठ्ठल-रूक्मिनी भेटल्याची अनुभूति मिळाली. पालखी सोहळ्याच्या रथातील विश्वस्तांनी पालखीतील हार या देखाव्यातील विठ्ठल – रुक्मिणीला परिधान करण्यासाठी दिल्याने हा देखावा विश्वस्तांनाही भावल्याची प्रचिती आली.

अनेकांना या विठ्ठल – रुक्मिणी सोबत फोटो आणि सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. भाविक भक्त नतमस्तकही होत होते, तर काहींना दान करण्याचा मोह झाला. हा दर्शन सोहळा वारकर्यांसह भाविक भक्तांच्या मनाला खूपच भावल्याने सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला.
मुलांमध्ये भक्तिभाव रुजविण्यासाठी उपयुक्त उपक्रम : डॉ. प्रसाद जोशी
‘‘मुलांमध्ये लहान पणापासूनच संस्कार आणि भक्तिभाव रुजविण्यासाठी असे उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरतील’’, असा विश्वास व्यक्त करून विठ्ठल नामाचे उच्चारण हे ह्रदयाच्या आरोग्यासाठी किती प्रभावी आहे हे प्रसिद्ध अस्थीरोगतज्ञ डॉ.प्रसाद जोशी यांनी यावेळी सांगितले.
अशा उपक्रमातून शाळेचे वेगळेपण सातत्याने सिद्ध होते : रविंद्र बेडकिहाळ
‘‘विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि सांस्कृतिक जाणीव रूजवण्यासाठी प्रशालेच्यावतीने सातत्याने घेतले जाणारे उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहेत. यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असून अशा उपक्रमातून शाळेचे वेगळेपण सातत्याने सिद्ध होत आहे’’, असे गौरवोद्गार संस्थेचे सचिव रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त करुन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
दर्शन सोहळा यशस्वीतेसाठी मनीष निंबाळकर आणि भिवा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
