‘उमेद’ च्या माध्यमातून दिदी लखपती

। लोकजागर । सातारा । दि. 12 जुलै 2025 ।

स्वयं सहायता समूहातील महिलांची प्रगती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती (उमेद) अभियान राबवित आहे. या अभियानांतर्गत कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महिलांसाठी शाश्वत उपजीविकेचे स्त्रोत निर्माण होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचवावा यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यांना या माध्यमातून लखपती दिदी करण्यात येत आहे. उमेदच्या माध्यमातून सातारा तालुक्यातील दुर्गम परळी खोऱ्यात पारंपारिक कुंभार व्यवसायातून लखपती दिदी झालेल्या अंजना शंकर कुंभार यांचा जीवनमान उंचावण्याचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, त्यांची ही यशोगाथा……

अंजना यांचे लग्नापूर्वीचे आयुष्य पुणे येथे गेल्यामुळे पारंपारिक कुंभारकामाची कला त्यांच्याकडे नव्हती. दहावी पर्यंत शिक्षण झालेल्या अंजना या सुरुवातीपासून जिद्दी आहेत. लग्नानंतर त्यांचे आयुष्य पूर्ण बदलले, पुण्यासारख्या शहरी वातावरणातून परळी सारख्या दुर्गम गावी त्या आल्या. सासरचे कुटुंब कुंभार व्यवसायावरच अवलंबून होते. दोन मुलांच्या जन्मानंतर अंजना यांना स्वतः देखील घरच्या व्यवसायात हातभार लावावा असे वाटू लागले. त्यातच गावामध्ये ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे वारे वाहत होते. अंजना यांच्या मनातल्या सुप्त इच्छेला ‘उमेद’ चे पंख मिळाले.

घरच्यांच्या साथीने आणि जिद्दीच्या जोरावर वयाच्या 32 व्या वर्षी खानापूर, बेळगाव येथे त्यांनी टेराकोटा आर्टचे प्रशिक्षण घेतले. अनुभव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर पुढे त्या या कामात निपुण झाल्या. सुरुवातीला फक्त पणत्या, गणेशमूर्ती बनवण्यापर्यंत मर्यादित असलेला उद्योग आता आकर्षक भांडी, मातीच्या सजावटीच्या वस्तू, विविध मूर्ती, मातीचे दागिने इत्यादी बनवण्यापर्यंत विस्तारला आहे.

व्यवसाय वाढीसाठी उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून गटासाठी मिळालेल्या फिरता निधी, समुदाय गुंतवणूक निधी, आणि बँकेकडून मिळालेले अर्थसाहाय्य यातून त्यांना आर्थिक पाठबळ मिळाले. केंद्र शासनाच्या मुद्रा आणि विश्वकर्मा योजनेतून मिळालेल्या लाभामुळे त्यांच्या गावातील बचत गटात असणाऱ्या इतर महिलांना रोजगार देण्याइतपत त्यांच्या व्यवसायाची व्याप्ती वाढली आहे.

आज त्यांच्या व्यवसायात 6 कामगार मदतीला आहेत. ‘उमेद’ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियानाच्या माध्यमातून विविध प्रदर्शने आणि कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी आपला व्यवसायाची उलाढाल वाढवली आहे. आजमितीला त्यांची वार्षिक उलाढाल ही 15 लाखांच्या घरात गेली असून त्या स्वतः लखपती दीदी बनलेल्या आहेत. त्यांच्या या प्रवासात त्यांचे पती शंकर कुंभार, कुटुंबीय आणि ‘उमेद’ अभियानाची त्यांना भक्कम साथ मिळाली आहे.

अंजना कुंभार म्हणतात, उमेदच्या सहकार्याने माझी आर्थिक उन्नती झाली आहे. उमेदच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन, आर्थिक पाठबळ मिळाले आहे. बदलत्या कुंभार व्यवसायातून चांगली आर्थिक उलाढाल होत आहे. ‘माझे कुटुंब सुखी आणि समाधानी जगत आहे. महिलांनीही उमेदच्या माध्यमातून आपल्या पारपांरिक अथवा त्यांच्या आवडीच्या व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करावा आपले जीवनमान उंचावावे’, असे आवाहनही श्रीमती कुंभार करतात.

वर्षा पाटोळे, जिल्हा माहिती अधिकारी, सातारा

Spread the love