| लोकजागर | फलटण | दि. २८ जुलै २०२५ |
“जग फार सुंदर आहे ते पाहण्यासाठी शरीर उत्तम ठेवा, व्यायाम करा. तरुण पिढीने असे ध्येय ठेवणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राध्यापक शरद इनामदार केले.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र फलटण यांच्यावतीने नवलबाई मंगल कार्यालय येथे विद्यार्थी गुणगौरव व शिष्यवृत्ती कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य सुभाषराव देशपांडे तर केंद्रप्रमुख विजय ताथवडकर व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

“मी ४१ देशांना भेट देऊन त्यांचा आनंद घेतला. प्रत्येक देशाचे वैशिष्ट्य मी अनुभवले. माझी तब्येत उत्तम होती म्हणूनच ते शक्य झाले. यासाठी तरुण पिढीने व्यायाम व उत्तम सकस आहार घ्यावा व त्याचा आनंद लुटावा”, असे शरद इनामदार यांनी सांगितले.

प्रारंभी प्रमुख मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी केंद्रप्रमुख विजय ताथवडकर यांनी सर्वांचे स्वागत करून वर्षभर पार पडलेल्या कार्यक्रमाचा धावता आढावा घेतला व प्रमुख मान्यवरांना भेटवस्तू देऊन त्यांना सन्मानित केले.
यावेळी दहावी, बारावी व विशेष गुण प्राप्त विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. एकूण नऊ विद्यार्थ्यांना दीड लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात सुभाष देशपांडे यांनी संस्थेच्या विविध कार्यक्रमाची प्रशंसा केली.
प्रमुख पाहुण्यांची ओळख अमोद कुलकर्णी व सुनील बरसावडे यांनी करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप देशपांडे यांनी केले तर आभार अनिरुध्द रानडे यांनी मानले.
या समारंभास संस्थेचे सभासद, हितचिंतक, देणगीदार, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.