फलटण तालुक्यात राष्ट्रवादीचे काम अधिक मोठ्या प्रमाणात वाढवणार : सौ. प्रतिभाताई शिंदे

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या पदाधिकारी निवडी जाहीर

। लोकजागर । फलटण । दि. 5 ऑगस्ट 2025 ।

‘‘नवनियुक्त महिला पदाधिकारी महिला आयोगामध्ये, वकिली क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या मदतीने फलटण तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे काम अधिक मोठ्या प्रमाणात वाढवणार’’, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या फलटण तालुकाध्यक्षा सौ. प्रतिभाताई शिंदे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. सीमाताई जाधव, जिल्हा उपाध्यक्षा लक्ष्मीताई कळंबे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फलटण तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या निवडी स्वर्गीय सुभाषराव शिंदे यांच्या ‘जिद्द’ या निवासस्थानी मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. त्यावेळी सौ. प्रतिभाताई शिंदे बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस रामभाऊ ढेकळे, ज्येष्ठ नेते डी. के पवार, निवृत्ती खताळ, शिंदेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच आनंद यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘‘जिल्हाध्यक्ष सौ. सीमाताई जाधव यांच्या सहकार्यामुळेच फलटण तालुक्यातील महिला आघाडीच्या नियुक्त्या करणे शक्य झाल्याचे’’ सांगून सौ. प्रतिभाताई शिंदे यांनी असेही सांगितले की, ‘‘या निवडीमध्ये अशा महिलांची निवड करण्यात आली आहे, ज्या सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रियपणे काम करत आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे काम अधिक प्रभावीपणे पुढे जाईल.’’ त्यांनी सर्व महिलांना आवाहन केले की, ‘‘महिलांच्या प्रगतीसाठी एकमेकींना सहकार्य करणे अत्यंत आवश्यक आहे.’’

सौ. सीमाताई जाधव म्हणाल्या, ‘‘ राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा आणि तालुक्यात पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करावे’’. महिला सक्षमीकरणावर भर देत, त्यांनी महिलांसाठी छोटे उद्योग सुरू करणे, बचत गट तयार करणे आणि सायबर गुन्हेगारीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. स्थानिक आमदार सचिन पाटील यांचे नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे सांगत, त्यांनी महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

दरम्यान, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी फलटण तालुका उपाध्यक्षपदी भिलकटी येथील सौ. दिपाली कांबळे व तांबवे येथील सौ. अर्चना शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. फलटण शहराध्यक्षपदी सौ. रेश्मा पठाण, सरचिटणीसपदी प्रिया सस्ते, तालुका चिटणीसपदी अश्विनी माने, मालन जगताप, आणि पूजा कडू यांची तर युवती शहराध्यक्षपदी राणी भोसले यांच्या निवडी नियुक्तीपत्र देऊन जाहीर करण्यात आल्या.

सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे पक्षाचे पदाधिकारी, सदस्य आदीसंह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Spread the love