‘आजच्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचे काय?’ : प्रा. डॉ. भास्करराव कदम यांचा सवाल

क्रांतिसिंह नाना पाटील यांना ‘विद्रोही’कडून अभिवादन; तरुण पिढीला इतिहासाचे आकलन करून घेण्याचा सल्ला

| लोकजागर | सातारा | दि. ० ऑगस्ट २०२५ |

महाराष्ट्र ज्या शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांनी घडला, त्याच महाराष्ट्राची पुरोगामी ओळख पुसली जात असल्याबद्दल प्रा. डॉ. भास्करराव कदम यांनी चिंता व्यक्त केली. आजच्या महाराष्ट्राला पुरोगामी म्हणायचे काय, असा सवाल त्यांनी सातारा येथील एका कार्यक्रमात उपस्थित केला.

सातारा येथील शिवाजी विद्यापीठ प्राध्यापक संघटनेच्या (सुटा) कार्यालयात ‘विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र’च्या सातारा जिल्हा शाखेने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. कॉ. वसंत नलावडे होते, तर कॉ. विजय मांडके विचारमंचावर उपस्थित होते.

डॉ. कदम म्हणाले, की इतिहासाची जाणीव नसल्यामुळे आजची तरुण पिढी बुद्धिभ्रंश झाल्यासारखी वागत आहे. त्यांनी इतिहासाचे योग्य आकलन करून घेणे गरजेचे आहे. त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदान, समाजप्रबोधन आणि स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय वाटचालीचा धावता आढावा घेतला. समाजवादाची सोपी व्याख्या लोकांपर्यंत पोहोचवणारे, प्रतिसरकारची स्थापना करणारे आणि संसदेत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे नाना पाटील यांची स्वप्ने अजूनही पूर्ण झाली नाहीत, असे सांगून त्यांनी पुन्हा एकदा क्रांतीच्या मशाली पेटवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना कॉ. वसंत नलावडे म्हणाले, की नाना पाटील यांची वक्तृत्व शैली खास होती. त्यांनी अवघड गोष्टी सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवून प्रबोधन केले. आता पुढील काळात त्यांच्या विचाराने विद्रोहाद्वारे क्रांतीकडे जावे लागेल आणि त्यासाठी तीव्र लढा उभा करावा लागेल.

कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. यावेळी ‘सम्यक विद्रोही’ या मासिकाच्या क्रांतिसिंह नाना पाटील आणि कॉ. अण्णाभाऊ साठे यांच्यावरील विशेष अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. कॉ. विजय मांडके यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर प्रा. राहुल गंगावणे यांनी सूत्रसंचालन केले. शुभम ढाले यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला प्रा. डॉ. विजय माने, सुनील गायकवाड, बाबुराव शिंदे, डॉ. पल्लवी साठे-पाटोळे, अमोल पाटोळे, दिलीप भोसले, अबू शेख, नितनवरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love