सेवा भारतीच्या ‘फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्पा’चे फलटण तालुक्यात उद्घाटन

| लोकजागर | फलटण | दि. ८ ऑगस्ट २०२५ |

सेवा भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या “फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्पा”चा उद्घाटन समारंभ फलटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरढे व बरड येथे संपन्न झाला. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबाबतची रुची निर्माण करणे आणि प्रयोगांच्या साहाय्याने त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट करणे हे उद्दिष्ट आहे.

बरड व मिरढे या दोन्ही शाळांनी या प्रकल्पासाठी काही दिवसांपूर्वी प्रस्ताव सादर केला होता. शाळांची पटसंख्या १०० च्या पुढे असून, या दोन्ही शाळांची पाहणी सेवा भारतीचे श्री पोपट बर्गे व श्री संजय श्रीखंडे यांनी केली होती.

प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी सेवा भारतीचे प्रांत शिक्षण आयाम प्रमुख श्री अरुण केळकर, सहाय्यक प्रांत सदस्य श्री शशिकांत ओक, जिल्हा सचिव श्री हेमंत गोपाळ देशपांडे, जिल्हा शिक्षण आयाम प्रमुख श्री मोहन ढाणे तसेच सातारा जिल्हा निधी प्रमुख श्री संजय श्रीखंडे व ‘एअर गुरुजी’ म्हणून परिचित असलेले श्री राजेंद्र खवळे उपस्थित होते.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिरढे येथील मुख्याध्यापक श्री विनोद पाटील, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य तसेच गावचे सरपंच यांनी या मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी सेवा भारतीच्या विविध सेवाकार्यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. यावेळी दोन्ही शाळांनी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी विनंती केली.

कार्यक्रमात मिरढे शाळेतील ७ वीच्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अशा प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयावरील आत्मविश्वास व आकलन वाढण्यास नक्कीच मदत होईल, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

Spread the love