श्रीराम एज्युकेशन सोसायटी संकुलात स्व. यशवंतराव चव्हाण यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
। लोकजागर । फलटण । दि. १४ मार्च २०२५ ।
‘‘स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांनी कौटुंबिक नाती कधीही सोडली नाही. पुणे येथे आवर्जून सर्व नातेवाईकांना बोलावून ते चौकशी करत असत. कुटुंब भक्कम तर राष्ट्र मजबूत या विचाराचे ते होते. लहानपणापासूनच देशभक्तीने ते प्रेरित झाले होते. त्यांच्या कार्याने राजकारणातील अनेक महत्त्वाची पदे त्यांच्याकडे चालत आली होती. आज महाराष्ट्राने यशवंतरावांचे विचार सोडले आहेत म्हणून आज महाराष्ट्राची ही अवस्था झाली आहे’’, असे मत ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी व्यक्त केले.

थोर नेते, देशाचे माजी उपपंतप्रधान तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची ११२ वी जयंती बुधवार दिनांक १२ मार्च, २०२५ रोजी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, सौ. वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण, नामदेवराव सूर्यवंशी (बेडके) महाविद्यालय फलटण व सौ. वेणूताई चव्हाण डी फार्मसी कॉलेज, फलटण या चारही शाखांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाली. त्याप्रसंगी बेडकिहाळ बोलत होते.
प्रारंभी श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते जिंती नाका फलटण येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व स्वर्गीय सौ. वेणूताई चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यानंतर श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सी. एल. पवार, संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके), संस्थेच्या नियामक मंडळाचे सदस्य महेंद्र सूर्यवंशी (बेडके), प्रमुख अतिथी चि. रिद्धिमान सचिन सूर्यवंशी (बेडके), संस्था सदस्य शिवाजीराव बेडके, हनुमंतराव निकम, जेष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. विक्रम आपटे, प्राचार्य शांताराम आवटे, रविंद्र बर्गे, सावंत सर व चारही शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य यांचे हस्ते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रशालेचे उप प्राचार्य पी. डी. घनवट यांनी कार्यक्रमाचा उद्देश व हेतू स्पष्ट केला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांची जयंती व संस्थेचे मानद सचिव डॉ. सचिन सूर्यवंशी (बेडके) यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या विविध शाखांमध्ये राबवण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा, दंततपासणी शिबिर, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप या उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील विद्यार्थ्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विषयी माहिती आपल्या भाषणामधून सांगितली. यामध्ये आदर्श शिंदे, श्रेयणी तगारे, श्रावणी नाळे, आर्यन ननावरे, श्रेया भोसले व शितल खिलारे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.
यानंतर मार्गदर्शन करताना प्रा. विक्रम आपटे म्हणाले, ‘‘स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी समाजातील सर्व घटकांचा विचार करून राज्य केले. स्वतःच्या कार्याने महाराष्ट्रात त्यांनी वेगळा ठसा निर्माण केला. जबाबदारीची जाणीव असलेले ते राजकीय नेते होते.’’ प्राचार्य शांताराम आवटे यांनी आपल्या मनोगतातून यशवंतराव चव्हाण यांचा दूरदृष्टीकोन व सुसंस्कृतपणा अनेक उदाहरणांनी सांगितला.

इंडियन डेंटल असोसिएशन बारामती यांच्या वतीने प्रशालेतील विद्यार्थ्यांकरिता दंत शिबिर आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर डॉ. तेजस्विता देशपांडे व त्यांच्या टीमच्या सहकार्यातून पार पडले. फलटण मेडिकल फाउंडेशनच्या टीम द्वारे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांच्यासह शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले. सी. एल. पवार यांच्या हस्ते प्रशालेतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.

या कार्यक्रमाकरिता चारही शाखांमधील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता प्रशालेचे प्राचार्य एस. बी. थोरात व उपप्राचार्य पी. डी. घनवट यांनी उत्तम नियोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एस. के. अडसूळ यांनी केले तर आभार एस. जी. सौ. धुमाळ यांनी मानले.