चोरीची बॅग अर्ध्या तासात परत; फलटण पोलिसांची कौतुकास्पद तत्परता

| लोकजागर | आनंद पवार | फलटण | दि. ९ ऑगस्ट २०२५ |

फलटण बसस्थानक पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे चोरीला गेलेली बॅग अवघ्या अर्ध्या तासातच महिलेला परत मिळाली. फलटण शहर पोलिसांच्या या वेगवान कारवाईचे सर्वसामान्य प्रवासी आणि नागरिकांतून कौतुक होत आहे.

घटनेची माहिती अशी की, संबंधित महिला फलटण-पंढरपूर मार्गावरील गाडीतून प्रवास करत होती. फलाट क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या फलटण-पंढरपूर गाडीत ती बसल्यावर, तिच्या गळ्यातील हँडपर्स चोरीला गेली. महिलेने तत्काळ फलटण बसस्थानक पोलिस चौकीत तक्रार नोंदवली. त्या पर्समध्ये अंदाजे ४२ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन (विवो व सॅमसंग) होते.

तक्रार मिळताच पोलिस अंमलदार अनिल देशमुख व स्वप्नील खराडे यांनी फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नाम यांच्या सहकार्याने मोबाईल लोकेशनच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. अवघ्या अर्ध्या तासातच पर्स शोधून मूळ मालकिणीच्या ताब्यात देण्यात आली.

या कारवाईत ट्रॅफिक ऑर्डन किरण चव्हाण आणि एसटी बसस्थानकावरील विक्रेते अंकुश साळवे यांनीही मोलाची मदत केली. आपली बॅग परत मिळाल्याने संबंधित महिलेचा आनंद गगनात मावेनासा झाला. या कार्यतत्परतेबद्दल पोलिस अंमलदार देशमुख, खराडे आणि सहकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Spread the love