| लोकजागर | फलटण | दि. ११ ऑगस्ट २०२५ |
सांगली, विटा, दहिवडी, फलटण, बारामती आणि अहिल्यानगर (अहमदनगर) यांना जोडणारा प्रस्तावित महामार्ग फलटण शहराच्या मध्यवर्ती भागातून जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, यामुळे स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे. कोळकी, दुधेबावी, झिरपवाडी, भाडळी, पृथ्वी चौक, क्रांतिसिंह नाना पाटील चौक आणि बारामती पुल या भागांतून जाणाऱ्या मार्गामुळे अनेक इमारतींना धोका, रिंगरोड आणि कोळकी रोडवरील व्यवसायांचे मोठे नुकसान, तसेच वाहतूक कोंडी व अपघातांची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर आज, सोमवार दि. ११ ऑगस्ट रोजी विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी नागरिक व व्यावसायिकांनी भेट देऊन महामार्ग शहराबाहेरून काढण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.

निवेदनाची तात्काळ दखल घेत रामराजेंनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी महामार्ग शहराबाहेरून नेण्यासंबंधी ठोस प्रस्ताव तयार करण्याचे आणि स्थानिकांच्या हितांचे रक्षण करणाऱ्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक अपेक्षा निर्माण झाली आहे.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वीही फलटण आणि परिसराच्या विकासासाठी, विशेषतः कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून दुष्काळमुक्ती व शेती विकासासाठी महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्यामुळे स्थानिकांना खात्री आहे की, त्यांच्या हस्तक्षेपामुळे या महामार्गाच्या प्रश्नावर लवकरच समाधानकारक तोडगा निघेल.