| लोकजागर | फलटण | दि. १६ ऑगस्ट २०२५ |
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात ७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सकाळी आठ वाजता शाळा समितीच्या चेअरमन सौ. वसुंधरा राजीव नाईक – निंबाळकर तसेच मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत व राज्यगीत सादर करण्यात आले तसेच संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण संचालन करून तिरंगी ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर व नवीन प्राथमिक विद्यामंदिरातील गुणी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. याचबरोबर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त पालखी सोहळा काढण्यात आला व सर्व उपस्थितांनी सामूहिकरित्या पसायदान म्हटले.

या कार्यक्रमाला निमंत्रित सदस्य श्रीमती निर्मला रणवरे, मुधोजी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक रुपेश शिंदे, नवीन प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. शेख, मुधोजी बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. रजपूत, नवीन बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. साबळे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
