पत्र लेखनातूनही साहित्यिक घडतात – सुरेश शिंदे यांचे मत

| लोकजागर | फलटण | दि. ४ सप्टेंबर २०२५ |

“पत्र लेखन ही फक्त संवादाची पद्धत नसून, अनेक साहित्यिकांचा जन्म घडवणारी एक पायरी आहे,” असे मत ज्येष्ठ साहित्यिक सर्जाकार सुरेश शिंदे यांनी व्यक्त केले. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पत्र लेखन कमी होत चालले असले तरी पूर्वीच्या काळात पत्र व्यवहार ही सामाजिक जाणिवा आणि संवेदनशीलता प्रकट करण्याची महत्त्वाची साधनं होती, असे ते म्हणाले.

साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण व वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहित्यिक संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सुरेश शिंदे, रवींद्र येवले, संयोजक ताराचंद्र आवळे, सुधीर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरेश शिंदे पुढे म्हणाले, “माझ्या एका पत्रामुळे माझी सर्जा कादंबरी प्रकाशित झाली आणि ती पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आली. पूर्वी ज्येष्ठ मंडळी पत्रांना उत्तर देऊन समस्यांचे तोडगे काढत. यामुळे लेखक, कवी व पत्र लेखक यांना मोठा फायदा होत असे.”

यावेळी प्राचार्य शांताराम आवटे यांनी स्वावलंबनाचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “स्वाभिमान जागृत ठेवायचा असेल तर स्वावलंबी बनणे ही काळाची गरज आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्वावलंबी शिक्षणाच्या बळावर रयत शिक्षण संस्थेची उभारणी केली.”

प्राचार्य रवींद्र येवले यांनी ग्रामीण भागाच्या ओसाड होत चाललेल्या वास्तवाकडे लक्ष वेधले. “गांधीजी म्हणायचे खेड्याकडे चला, पण आज लोकांचा ओढा शहराकडे आहे. खेड्यांचा विकास करण्यासाठी गांधी विचार साहित्य संमेलन घेऊन तो विचार पुढे नेणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रेयश कांबळे यांनी केले, तर आभार प्रदर्शनही त्यांनीच केले. या वेळी सचिन जाधव, मंगेश कर्वे, विक्रम भांडवलकर, सचिन भांडवलकर, अमोल जाधव यांच्यासह फलटण तालुक्यातील अनेक साहित्यिक व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

Spread the love