। लोकजागर । फलटण । दि. 25 सप्टेंबर 2025 ।
मुधोजी प्राथमिक विद्यामंदिरात शारदीय नवरात्रोत्सव निमित्त श्रीमंत अनंतमाला देवी नवरात्र उत्सवाचे प्रथम पुष्प मान्यवरांच्या उपस्थितीत गुंफण्यात आले. या वेळी प्रशालेच्या चेअरमन सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर, व्हा. चेअरमन सौ. नूतन अजितसिंह शिंदे, निमंत्रित सदस्या श्रीमती निर्मला रणवरे, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रुपेश शिंदे, नवीन प्राथमिक विद्यामंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. शेख, बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. रजपूत, नवीन बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. साबळे, पाककला परीक्षक सौ. लोणकर, सौ. अनपट व कुमारी नेहा शिंदे (बालसमुपदेशन) यांच्यासह सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत अनंतमाला देवी व दुर्गादेवी मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या वेळी सौ. वसुंधरा राजीव नाईक निंबाळकर यांनी पौष्टिक आहाराचे आजच्या काळातील महत्त्व अधोरेखित केले. त्यानिमित्त पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे भाग घेतलेल्या महिला पालकांचे मान्यवरांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. स्पर्धेत उपवासाचे पौष्टिक व चविष्ट पदार्थ सादर करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायकवाड मॅडम यांनी केले. प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. रुपेश शिंदे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. पुनम शिंदे यांनी मानले.
