माजी खासदार रणजितसिंह राजे गटाशी मनोमिलन करणार नाहीत; नगरपरिषदेत ‘२७-०’ विजय मिळेल – अनुप शहा

। लोकजागर । फलटण । दि. 30 सप्टेंबर 2025 ।

“माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे राजे गटातील कोणत्याही नेत्याशी मनोमिलन करणार नाहीत. उलट ते आगामी नगरपरिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून ‘२७-०’ असा विजय मिळवतील,” असा ठाम विश्वास नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांनी व्यक्त केला.

तालुक्यात सुरू असलेल्या राजकीय मनोमिलनाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना शहा म्हणाले, “राजे गटातील उरले-सुरलेले कार्यकर्तेही रणजितसिंह यांच्या संपर्कात आहेत. हे कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडावर खासदार गटात प्रवेश करतील, ही खात्री असल्यामुळे राजे गट घाबरलेला आहे. त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी अफवा पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.”

शहा यांनी खासदार गटातील कार्यकर्त्यांना आश्वस्त करताना सांगितले, “माजी खासदार रणजितसिंह हे त्यांच्यावर विश्वास ठेवून आलेल्या कोणत्याही कार्यकर्त्याचा विश्वासघात करणार नाहीत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याचे श्रेय कार्यकर्त्यांना जाते. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषद निवडणुकीत ते आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी सर्व ताकदीने ठामपणे उभे राहतील. कार्यकर्त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.”

यावेळी शहा यांनी आरोप केला की, “राजे गटातील काही जण खासदार गटातील जुन्या निष्ठावंत व नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मनभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र रणजितसिंह यांनी नेहमीच सर्वांना समान मान दिला आहे, कधीही भेदभाव केलेला नाही.”

“आगामी निवडणुकीत फलटण नगरपरिषदेचा नगराध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती महायुतीचाच असेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता एकदिलाने कामाला लागावे,” असे आवाहन शहा यांनी केले.

Spread the love