। लोकजागर । सातारा । दि. २ ऑक्टोबर २०२५ ।
सत्य आणि अहिंसेची महात्मा गांधीजींची शिकवण आज समाजातील शांतता व सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी केले.
महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त लेक लाडकी अभियान व मुक्तांगण परिवार यांच्या वतीने “गांधी समजून घेताना” या विषयावर एक दिवसीय कृतिशील शिबिराचे आयोजन मुक्तांगण येथे करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

किशोर बेडकीहाळ म्हणाले, “महात्मा गांधींबद्दलचा द्वेष समाजात पसरवला जात आहे. ऐतिहासिक घटनांचा चुकीचा संदर्भ लोकांसमोर मांडला जात आहे. अशा वेळी ऐतिहासिक सत्य समाजासमोर आणणे हीच खरी गरज आहे. याकामी तरुण पिढीवर मोठी जबाबदारी आहे. त्यांनी गांधी विचारांचा अपप्रचार रोखण्यासाठी अभ्यास करून पुढाकार घ्यावा.”
ॲड. वर्षा देशपांडे म्हणाल्या की, अशा उपक्रमांमधून गांधी विचार अधिक दृढ होईल. तरुणांनी गांधींचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे.

या प्रसंगी राजीव मुळे लिखित व कैलास जाधव दिग्दर्शित, दलित महिला विकास मंडळ निर्मित “हक्क” हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. मुलींचे “माझ्या शरीरावर माझा अधिकार” हे पथनाट्य सादर झाले. तसेच सामाजिक चळवळीतील गीते एआय च्या माध्यमातून नव्या स्वरूपात तयार करून यूट्यूबवर अपलोड करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना किशोर बेडकीहाळ यांनी समर्पक उत्तरे दिली. गांधीजींच्या हुबेहूब वेशभूषेत अनिल मोहिते यांच्यासोबत सेल्फीसाठी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचीही झुंबड उडाली होती.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ कार्यकर्ते मिनाज सैय्यद, संजीव बोंडे, दलित महिला विकास मंडळाच्या अध्यक्षा ॲड. शैला जाधव, प्रणव पवार, स्वाती बल्लाळ, सिंधुताई कांबळे, मालताताई जावळे आदींसह साताऱ्यातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.
