फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशीही अर्जांचा शून्य आकडा

फलटण : फलटण नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज, मंगळवार (दि. 12 नोव्हेंबर) हा उमेदवारी अर्ज भरण्याचा दुसरा दिवस होता. मात्र, आजदेखील कोणत्याही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी ही माहिती दिली.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 10 ते 18 नोव्हेंबर अशी आहे. आजपर्यंत म्हणजे दोन दिवसांत शहरातील सर्व 13 प्रभागांतून एकूण अर्जांची संख्या शून्यच राहिली आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापत असले तरी प्रमुख पक्ष आणि गटांकडून उमेदवार निश्चितीबाबत अद्याप स्पष्टता नाही. त्यामुळे प्रारंभीच्या दोन दिवसांत अर्ज न दाखल होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

दरम्यान, उमेदवारी अर्ज स्वीकृतीसाठी नगरपरिषदेच्या कार्यालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याची माहिती मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.

Spread the love