| लोकजागर | फलटण | रोहित वाकडे | दि.१३ नोव्हेंबर २०२५ |
नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर फलटण शहरात राजे गटातील बड्या कार्यकर्त्यांचे महायुतीत प्रवेशाचे सत्र सुरू झाले असून, शहरातील राजकीय तापमान चांगलेच चढले आहे.
आधी माजी नगरसेवक सनी अहिवळे आणि त्यानंतर माजी नगरसेवक सोमाशेठ जाधव या दोन स्थानिक प्रबळ नेत्यांनी राजे गटाला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. हे दोघेही राजे गटातील जुने आणि प्रभावी कार्यकर्ते मानले जातात. आ. सचिन पाटील आणि श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेशामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढला असून, राजे गटाची मात्र भूमिका स्पष्ट होताना दिसत नाहीये.
अर्थातच या सर्व घडामोडींमुळे माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटाची ताकद फलटण शहरात आणखीन मजबूत झाली आहे. शहरात ठिकठिकाणी या राजकीय बदलाची चर्चा सुरू असून, “या वेळची निवडणूक एकतर्फी जाणार का काय?” अशा चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत आहेत.
राजे गटाची महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती आ. श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली गेली कित्येक वर्षे फलटण नगरपरिषदेवर एकहाती सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत होणाऱ्या सततच्या गळतीमुळे त्या सत्तेचे गणित बदलले जाण्याची श्यकता दिसून येत आहे. राजे गटाला आतापासूनच उमेदवार टिकवणं आणि नाराज कार्यकर्त्यांना थोपवणं हे मोठं आव्हान बनलं आहे.
