फलटण नगरपालिकेची रणधुमाळी ! विशाल तेलींच्या उमेदवारीमुळे प्रभाग 8 मध्ये होणार रंगतदार लढत

। लोकजागर । फलटण । दि. १८ नोव्हेंबर २०२५ ।

फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मध्ये ‘राजे गटा’ कडून उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. या प्रभागातून मोठे शक्तिप्रदर्शन करून युवा कार्यकर्ते विशाल तेली यांनी जोरदार मागणी केली होती. प्रभागातील मोठा वर्ग त्यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याने ‘राजे गटा’वरही त्यांच्या नावाचा विचार करण्याची जबाबदारी होती. आता अखेर राजे गटाकडून विशाल तेली यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले असून, यामुळे प्रभाग ८ ची निवडणूक आता खऱ्या अर्थाने रंगतदार होणार आहे.

विशाल तेली हे प्रभागातील एक अत्यंत सक्रिय आणि उमदे युवा कार्यकर्ता म्हणून ओळखले जातात. सार्वजनिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग नेहमीच आग्रही असतो, त्यामुळे तरुणाईमध्ये त्यांची मोठी क्रेझ आहे. त्यांनी उमेदवारीची चर्चा सुरू होण्यापूर्वीच आपली जनसंपर्क मोहीम सुरू केली होती. नागरिकांच्या भेटीगाठी, प्रभागातील अडचणींची नोंद घेणे आणि लोकांमध्ये मिसळून काम करणे, हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे, त्यांची उमेदवारी जाहीर होताच प्रभागातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘राजे गटा’ने एका तरुणाला संधी दिल्याने निवडणुकीत जोश वाढणार हे निश्चित आहे. एका बाजूला पारंपरिक राजकीय अनुभव, तर दुसऱ्या बाजूला तरुणाईचा उत्साह आणि कामाचा धडाका अशी ही लढत असणार आहे. विशाल तेली यांनी प्रचाराची सुरुवात शांतपणे केली असली तरी, आता अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यावर ते प्रचारात कोणती रणनीती आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

एकंदरीत, प्रभाग क्रमांक ८ मध्ये विशाल तेली मोठ्या ताकदीने उतरले असून त्यांचा जनसंपर्क आणि सार्वजनिक कामांमधील सक्रियता या बळावर ते मतदारांना आकर्षित करतील. दुसरीकडे विशाल तेली यांना विरोधकांचे तगडे आव्हान असणार असल्याचे स्पष्ट असून ‘राजे गटा’चा विश्वास आणि प्रभागातील तरुणाईचा पाठिंबा घेऊन विशाल तेली आता निवडणुकीच्या रणांगणात कशी ‘खेळी’ करतात आणि मतदारांचे मन कसे जिंकतात, यावरच त्यांचा आणि ‘राजे गटा’चा या प्रभागातील विजय अवलंबून असेल.

Spread the love