“आरोपांवर वेळ घालवू नका, विकासाची ‘ब्लू प्रिंट’ मांडा!” – फलटणच्या नेत्यांना नंदकुमार मोरे यांचा थेट सल्ला

| लोकजागर | फलटण | दिनांक ४ डिसेंबर २०२५ |

फलटण नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते नंदकुमार मोरे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत महत्त्वपूर्ण पोस्ट शेअर करत सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि नेत्यांना विचारपूर्वक भाष्य करण्याचा सल्ला दिला आहे. नाहक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी फलटणकरांना काय हवे आहे यावर लक्ष केंद्रित करण्याची आणि विकासात्मक ध्येय धोरणे स्पष्ट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. कोणत्याही नेत्याने किंवा गटाने स्वतःला ‘सिकंदर’ समजून इतरांना कमी लेखू नये, तसेच वयोमानानुसार शब्दांचा वापर करावा, असे परखड मत त्यांनी मांडले आहे.

मोरे यांनी भूतकाळातील गोष्टी उगाळण्याऐवजी वर्तमान काळ पाहून भविष्यकाळ उज्ज्वल कसा होईल, तसेच जनतेचे आर्थिक जीवनमान कसे उंचावले जाईल, यावर राजकीय पक्षांनी व्यक्त व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. “कोणी किती दिवे लावले आहेत, हे सगळं ‘ये पब्लिक है सब जानती और पहचानती है’,” असे ठणकावून सांगत त्यांनी अनावश्यक कौतुक सोहळे आणि घोषणाबाजी टाळण्याचे आवाहन केले. फलटण शहरातील पायाभूत सुविधा आणि मूलभूत गरजांसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी; निष्फळ व वायफळ बडबड टाळावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

राजकीय प्रवाहात नकारात्मकता उपयुक्त ठरत असेलही, पण फलटण तालुका व शहराच्या सार्वजनिक आणि सामाजिक समतोलासाठी आपापसात सकारात्मक विचार असणे आवश्यक आहे, असे मोरे यांनी स्पष्ट केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केवळ नारेबाजी करण्यापेक्षा नीती आणि भविष्यातील उगवते कामकाज यांवर आधारित ‘चित्रपट’ (व्हिजन) लोकांसमोर मांडावा, तरच लोक जवळ येतील, अन्यथा सावरायलाही कोणी येणार नाही, असे परखड भाकीत त्यांनी केले.

मोरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना ‘सबुरीने घ्या’ आणि ‘लोकशाहीच्या लोकोत्सवात आनंदाने सहभागी व्हा’ असे आवाहन केले. यंदा नवनिर्माण विचारांचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक म्हणून निवडून येणार आहेत, त्यांना त्यांच्या सामर्थ्याची ओळख करून देण्याची संधी उपलब्ध होणार आहे. “या नव्या पिढीच्या अनुभवांचा देशाला लाभ व्हायला हवा. त्यांच्या अभिव्यक्तीला वाव मिळू दिला पाहिजे. आपल्या निराशा आणि पराभवासाठी त्यांचा बळी देऊ नका,” अशी महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी केली.

Spread the love