। लोकजागर । फलटण । दि. २८ डिसेंबर २०२५ ।
फलटण नगरपरिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधील शिवसेनेचे उमेदवार दादासाहेब चोरमले यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, हा निकाल केवळ एका उमेदवाराचा पराभव नसून, तो सर्वसामान्य, कष्टकरी आणि गरजू लोकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या एका संवेदनशील नेतृत्वाचा पराभव असल्याची भावना फलटणकरांमधून व्यक्त होत आहे. “पराभव हा तात्पुरता असतो, पण जनतेच्या मनातील स्थान कायम असते,” अशा शब्दांत सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून नागरिक चोरमले यांना मोठे पाठबळ देत आहेत.
विकासाची पंचवीसी: २२ कोटींची दर्जेदार कामे
तत्कालीन प्रभाग क्रमांक ९ मध्ये नगरसेविका सौ. वैशालीताई चोरमले यांच्या कार्यकाळात दादासाहेब चोरमले यांनी विकासाचा डोंगर उभा केला होता. त्यांच्या प्रयत्नांतून प्रभागात सुमारे २२ कोटी रुपयांची विविध विकासकामे पूर्ण झाली. यामध्ये प्रामुख्याने अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, पेविंग ब्लॉक, आधुनिक जिमची उभारणी, आणि समाजमंदिरांचे सुशोभीकरण यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या कामगिरीमुळेच या प्रभागाला ‘स्वच्छ सर्वेक्षण अभियानात’ शहरातील सर्वोत्कृष्ट प्रभागाचा बहुमान मिळाला होता. ५७ कुटुंबांना हक्काचे शौचालय आणि अनेकांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुले मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे.
मदतीला धावणारा ‘आपला माणूस’
केवळ विकासकामेच नव्हे, तर कोविडसारख्या कठीण काळात फिरता दवाखाना आणि अन्नधान्य किट वाटप करून त्यांनी माणुसकीचे दर्शन घडवले. अलीकडच्या काळात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे अर्ज भरून घेण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता. नगरसेवक पदावर असो वा नसो, वेळेचा विचार न करता पदरमोड करून लोकांच्या मदतीला धावणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आजही कायम आहे.
संघर्ष संपत नाही, तो नवे वळण घेतो!
प्रभाग ११ मधील हा निकाल अनेकांसाठी अनपेक्षित असला, तरी त्यांच्या समर्थकांनी त्यांना नव्या उमेदीने पुन्हा कामाला लागण्याचे आवाहन केले आहे. “हा पराभव तुमच्या कामाचा किंवा निष्ठेचा नाही, तर निवडणुकीतील एका गणिताचा आहे,” अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत. अभ्यासू विचार, स्पष्ट भूमिका आणि प्रभावी वक्तृत्वाच्या जोरावर दादासाहेब चोरमले पुन्हा एकदा जोमाने सार्वजनिक जीवनात सक्रिय होतील, असा विश्वास त्यांच्या मित्र परिवाराने आणि मतदारांनी व्यक्त केला आहे.
राजकीय संघर्षातूनच नेतृत्व अधिक मजबूत होते, या उक्तीप्रमाणे दादासाहेब चोरमले भविष्यात नव्या जिद्दीने फलटणच्या राजकारणात आणि समाजकारणात पुन्हा भरारी घेतील, असे चित्र सध्या दिसत आहे.
