‘सखोल वाचन ही काळाची गरज’ – प्राचार्य डॉ. राजाराम राठोड; ओरोस येथे ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर वक्तृत्व स्पर्धा’ उत्साहात संपन्न

। लोकजागर । ओरोस (सिंधुदुर्ग) । दि. २८ डिसेंबर २०२५ ।

“वृत्तपत्र हे केवळ बातम्यांचे साधन नसून ते समाजप्रबोधन आणि ज्ञानार्जनाचे एक सशक्त माध्यम आहे. आजच्या डिजिटल युगात सखोल वाचन ही काळाची गरज बनली आहे. बाळशास्त्री जांभेकर यांना मिळालेल्या ‘आचार्य’ आणि ‘शास्त्री’ या उपाध्या त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या उंचीचे परिमाण आहेत,” असे प्रतिपादन राजापूर येथील आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांनी केले.

जांभेकर कुटुंबीय व गुरुकुल करिअर अकॅडमी, ओरोस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर वक्तृत्व स्पर्धेच्या’ उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

मान्यवरांची उपस्थिती आणि गौरव

कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. राजाराम राठोड यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर सुप्रियाताई वालावलकर, गजानन जडये, ओरोसचे उपसरपंच पांडुरंग मालवणकर, अकॅडमीच्या संचालिका श्रद्धाताई ढोणुकसे, प्रा. एस. जी. ढोणुकसे आणि बाळशास्त्री जांभेकर यांचे वंशज विक्रम जांभेकर उपस्थित होते.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील स्पर्धकांनी आपल्या वक्तृत्वाने उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेचे परीक्षण कणकवली कॉलेजचे विजयकुमार सावंत व ओरोस कॉलेजचे सुभाष बांबुळकर यांनी केले. कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन प्रा. बाजीराव जांभेकर यांनी केले.

स्पर्धेचा निकाल आणि विजेते

विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. निकाल खालीलप्रमाणे आहे:

  • प्रथम क्रमांक: आर्या सत्यवान जोईल (पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड)
  • द्वितीय क्रमांक: श्रावणी राजन आरावंदेकर (सातेरी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, वेतोरा)
  • तृतीय क्रमांक: आदेश हिराकांत खानोलकर (राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी)

उत्तेजनार्थ पारितोषिके: १) वेदांत शिवप्रसाद नाईक (टोपीवाला ज्युनियर कॉलेज, मालवण) २) साक्षी दत्तात्रय साळकर (दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूरतिठा) ३) समीक्षा सुभाष मर्गज (दादासाहेब वराडकर जुनियर कॉलेज, कट्टा)

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गजानन जडये, जयवंत परब, सुप्रिया वालावलकर, धनश्री देऊसकर आणि प्रवीण सरवटे यांनी विशेष सहकार्य केले.

Spread the love