‘जसा शिक्षक तशी शाळा’; शिक्षकांनी बदल स्वीकारून सकारात्मक राहणे काळाची गरज : ताराचंद्र आवळे

। लोकजागर । फलटण (जिंती) । दि. २८ डिसेंबर २०२५ ।

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षकाची भूमिका कळीची असते. शाळा हे केवळ इमारत नसून ते प्रगतीचे साधन आहे, त्यामुळे जसा शिक्षक असेल तशीच शाळा घडते. आजच्या आव्हानात्मक काळात शिक्षकांनी बदलांचा स्वीकार करून विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षक व समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या, श्री जितोबा विद्यालय जिंती (ता. फलटण) येथे आयोजित केंद्रीय शिक्षण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रप्रमुख दादासाहेब रणवरे, केंद्र संचालक सचिनदेव चौगुले, सहाय्यक उमेश पिसाळ, विषयतज्ज्ञ नंदू कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आव्हाने आणि तंत्रज्ञानाचा वापर

ताराचंद्र आवळे यांनी आपल्या मार्गदर्शनात प्रामुख्याने शाळांची पटसंख्या टिकवण्याच्या आव्हानावर भाष्य केले. ते म्हणाले की, “शिक्षकांसमोर अनेक आव्हाने आहेत, मात्र जो सकारात्मक वृत्तीने संकटांचा सामना करतो, तोच यशस्वी होतो. अलीकडच्या काळात बदलणाऱ्या अभ्यासक्रमाचा स्वीकार करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार ज्ञान देणे हे आपले पहिले कर्तव्य आहे.”

तसेच, आधुनिक तंत्रज्ञानावर बोलताना त्यांनी शिक्षकांना सतर्क केले. AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर केवळ विधायक कामांसाठीच करा, अफवा पसरवण्यासाठी त्याचा वापर करणे समाजासाठी घातक ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईलचा वापर अपरिहार्य असला तरी, त्याचा वापर किती आणि कसा करावा यावर शिक्षकांचा कटाक्ष असणे गरजेचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

‘बुके’ ऐवजी ‘बुक’ देऊन अनोखा सत्कार

या परिषदेचे खास वैशिष्ट्य म्हणजे, उपस्थित मान्यवर, मुख्याध्यापक आणि शिक्षकांचा सत्कार पारंपरिक फुलांच्या गुच्छांऐवजी (बुके) पुस्तके (बुक) देऊन करण्यात आला. वाचन संस्कृती वाढीस लागावी या उद्देशाने राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, यामुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.

९९ व्या साहित्य संमेलनाचे निमंत्रण

साताऱ्यातील शाहू स्टेडियमवर १ जानेवारी ते ४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबतही यावेळी जनजागृती करण्यात आली. या ‘सारस्वतांच्या मेळ्या’त जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन संमेलन यशस्वी करावे, असे आवाहनही ताराचंद्र आवळे यांनी यावेळी केले.

या परिषदेत नंदू कोकरे, अमोल भिसे, राजेंद्र कदम, पुनम बोंद्रे, सुनीती कवितके यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश सोळंकी यांनी केले, तर आभार अमोल जाधव यांनी मानले. साखरवाडी केंद्रातील २५ शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love