विजयाचा गुलाल विरण्यापूर्वीच सिद्धाली शहा मैदानात; ‘आभार दौऱ्या’तून मतदारांशी जोडली थेट नाळ

। लोकजागर । फलटण । दि. 29 डिसेंबर 2025 ।

फलटण नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधून भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर विजयी झालेल्या कु. सिद्धाली अनुप शहा सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी नगरसेविका होण्याचा बहुमान मिळवलेल्या सिद्धाली यांनी विजयाचा जल्लोष करण्याऐवजी थेट कामाला सुरुवात केली आहे. माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांचा राजकीय वारसा लाभलेल्या सिद्धाली यांनी निवडणुकीचा निकाल लागताच प्रभागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन त्यांचे आभार मानण्यास सुरुवात केली असून, त्यांच्या या नम्रतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सामान्यतः निवडणूक जिंकल्यानंतर उमेदवार गायब होतात असा अनुभव असतो, मात्र सिद्धाली शहा यांनी हा समज खोडून काढला आहे. त्या स्वतः घरोघरी जाऊन मतदारांना पेढे भरवत आहेत आणि एक विशेष ‘आभार पत्र’ सुपूर्द करत आहेत. केवळ आभार मानून न थांबता, त्यांनी या पत्रात आपला वैयक्तिक मोबाईल नंबर दिला असून प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी एक विशेष ‘व्हॉट्सॲप ग्रुप’ देखील तयार केला आहे. “तुम्ही मला निवडून दिले, आता तुमची कामे करणे ही माझी जबाबदारी आहे,” असा विश्वास त्या नागरिकांना देत आहेत.

वकिलीचे शिक्षण घेतलेल्या सिद्धाली शहा यांनी आपल्या कृतीतून राजकीय प्रगल्भतेचे दर्शन घडवले आहे. अनुप शहा ज्याप्रमाणे शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आग्रही असतात, तोच वारसा पुढे नेत सिद्धाली यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकणे आणि त्या सोडवणे या त्यांच्या कल्पनेमुळे तरुण वर्गासोबतच ज्येष्ठ नागरिकही प्रभावीत झाले आहेत. एका लोकप्रतिनिधीने निवडून आल्यावर स्वतःहून दारात येऊन संपर्क क्रमांक देणे, ही फलटणकरांसाठी नवी आणि आश्वासक गोष्ट ठरली आहे.

प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांनी सिद्धाली यांच्या या उपक्रमाचे मोठे कौतुक केले आहे. “आजवर अनेक निवडणुका पाहिल्या, पण विजयानंतर इतक्या तत्परतेने दारात येणारी ही पहिलीच उमेदवार आहे,” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. २१ व्या वर्षातील ही समज आणि कामाची तळमळ पाहता, प्रभाग ८ च्या विकासाला आता नवी गती मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सिद्धाली शहा यांच्या या ‘ॲक्शन मोड’मुळे फलटणच्या राजकारणात एक नवा आदर्श निर्माण झाला आहे.

Spread the love