। लोकजागर । फलटण । दि. १ जानेवारी २०२६ ।
फलटण येथील कृष्णामाई मेडिकल ट्रस्ट व निकोप हॉस्पिटलच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेविका कुमारी सिद्धाली शहा आणि सौ. रूपालीताई सस्ते यांचा नागरी सत्कार करण्यात आला. नगरपरिषदेत लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आरोग्यासारख्या मूलभूत विषयाला प्राधान्य मिळावे, या उद्देशाने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना डॉ. जे. टी. पोळ म्हणाले की, “आरोग्य क्षेत्रात शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना आहेत, मात्र माहितीच्या अभावामुळे त्या गरजू जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. नवनिर्वाचित नगरसेविकांनी या योजना प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निकोप हॉस्पिटलला सहकार्य करावे, जेणेकरून गोरगरीब रुग्णांना आधुनिक उपचारांचा लाभ घेता येईल.”
सत्काराला उत्तर देताना नगरसेविका सिद्धाली शहा यांनी आरोग्य विषयावर आपला ठाम निर्धार व्यक्त केला. “प्रभागातील नागरिकांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. आरोग्याशी निगडित असलेल्या सर्व शासकीय योजना आणि सवलती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी मी आणि माझे सहकारी शंभर टक्के प्रयत्न करू,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
या सत्कार प्रसंगी अनुप शहा, अमोल सस्ते, सौ. सुनिता पोळ, सिद्धांत शहा यांच्यासह निकोप हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित होते. नगरसेविकांच्या या पुढाकारामुळे शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सुलभ होण्यास मदत होईल, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
