। लोकजागर । सातारा (स्वराज्यरक्षक छत्रपती शाहू महाराज साहित्यनगरी) । दि. २ जानेवारी २०२६ ।
सदैव कृतिशील असणारी माणसे केवळ स्वतः आनंदी राहत नाहीत, तर आपल्या कतृत्वाने आणि विचारांनी संपूर्ण परिसराला आनंदित करतात. सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांनी आपली ही कृतिशीलता साहित्यातून सिद्ध केली आहे, असे गौरवोद्गार ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी काढले. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील दिग्गज साहित्यिकांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.
या सोहळ्याला संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत उपस्थित होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन जाधव पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई यांच्यासह बँकेचे सर्व संचालक मंडळ या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. जीवनाची इतिकर्तव्यता निष्ठेने पार पाडून साहित्यसेवा करणाऱ्या या प्रतिभावंतांचा सत्कार करण्याचे भाग्य लाभल्याबद्दल डॉ. भवाळकर यांनी आयोजकांचे आभार मानले.
या सोहळ्यात सातारा जिल्ह्याच्या साहित्य विश्वात मोलाचे योगदान देणाऱ्या जयवंत गुजर, न. म. जोशी, सतीश कुलकर्णी, नलिनी महाडिक, म. वि. कोल्हटकर, संभाजीराव पाटणे, रवींद्र बेडकीहाळ, वि. ना. लांडगे, रमणलाल शहा, पुरुषोत्तम सेठ, शैलजा दाते, ॲड. डी. व्ही. देशपांडे, दिलीप पटवर्धन आणि श्याम भुर्के या मान्यवर साहित्यिकांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
साहित्यिक सत्कारासोबतच या व्यासपीठावर एका महत्त्वाच्या ग्रंथाचे प्रकाशनही पार पडले. संस्कृती प्रकाशनाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आणि संभाजीराव पाटणे यांनी संपादित केलेल्या ‘जनसंवाद राजमातांचा’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. राजमाता सुमित्राराजे भोसले यांच्या राजकीय, सामाजिक आणि आध्यात्मिक भाषणांचा हा अनमोल संग्रह सातारच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा दस्तऐवज ठरणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन स्नेहल दामले यांनी केले, तर नंदकुमार सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले.
