। लोकजागर । फलटण । दि. २ जानेवारी २०२६ ।
फलटण नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष श्रीमंत समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि सौ. मनीषाताई नाईक निंबाळकर यांनी आज ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फलटण येथील श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टमध्ये भक्तीचा अनोखा आनंद लुटला. नागपूर सद्भक्त मंडळ आणि श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘पंचावतार उपहार वार्षिक महोत्सवात’ या दाम्पत्याने उपस्थित राहून सर्व धार्मिक विधींमध्ये सहभाग घेतला.
सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या या महोत्सवात विविध आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी कोणत्याही प्रोटोकॉलशिवाय सामान्य नागरिकांप्रमाणे महाप्रसादाच्या पंगतीत बसून प्रसादाचा लाभ घेतला. त्यांच्या या साधेपणाने उपस्थित भाविकांची मने जिंकून घेतली. यावेळी उपस्थित सर्व साधुसंत, महंत आणि आचार्य गण यांचे त्यांनी आशीर्वाद घेतले.
मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान
या मंगलप्रसंगी श्रीकृष्ण देवस्थान ट्रस्टच्या वतीने आचार्य बाबाजी आणि सुदामराज बाबा यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्षांचा यथोचित सन्मान करण्यात आला. नगराध्यक्षांनी या महोत्सवाच्या नियोजनाचे कौतुक करत, श्रीकृष्ण देवस्थान हे फलटणच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाचे प्रतीक असल्याचे मत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवर
या सोहळ्याला देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त बाळासाहेब ननावरे, जय ज्योती नागरी पतसंस्थेच्या संचालिका सौ. माधुरी ननावरे, शंभूराज बोबडे, सुमित चोरमले, अजित गायकवाड यांच्यासह नागपूरकर सद्भक्त मंडळाचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन विश्वस्त बाळासाहेब ननावरे यांनी केले.
दिवसभर चाललेल्या या सोहळ्यामुळे श्रीकृष्ण देवस्थान परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. नवनिर्वाचित नगराध्यक्षांनी कामाच्या व्यापातून वेळ काढून भक्ती रंगात सहभागी झाल्याबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले.
