सातारा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

। लोकजागर । सातारा । दि. ४ जानेवारी २०२६ ।

सातारा जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणांबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना. एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका शिवसेना पक्षाच्या वतीने स्वबळावर लढवण्याचे आदेश स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू झाल्या असून शिवसैनिकांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आली.

साताऱ्यातील सैनिक स्कूल ग्राउंड येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई आणि ना. भरत गोगावले यांची जिल्हयातील प्रमुख नेत्यांनी प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आगामी निवडणुकांच्या संदर्भात नामदार शिंदेंशी सविस्तर चर्चा केली. या चर्चेदरम्यान जिल्ह्यातील सर्व जागा पूर्ण ताकदीने लढवण्याचा दृढनिश्चय करण्यात आला.

दरम्यान, प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, शिवसेना जिल्हा समन्वयक विराज खराडे, तालुका प्रमुख नानासो इवरे, ज्ञानेश्वर पवार, अमोल निंबाळकर, अॅड संदीप कांबळे व जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते.

Spread the love