पुणे-पंढरपूर महामार्गावर काळजजवळ स्लजचा टिपर पलटी; निसरड्या रस्त्यामुळे दुचाकीस्वारांची घसरण

। लोकजागर । काळज । वसीम इनामदार । दि. 10 जानेवारी 2026 ।

पुणे-पंढरपूर महामार्गावर काळज गावच्या हद्दीत ‘स्लज’ (मळी मिश्रित सांडपाणी) वाहून नेणारा एक टिपर पलटी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर स्लज सांडले असून, रस्ता कमालीचा निसरडा झाला आहे. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या अनेक दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटून अपघाताच्या घटना घडत असल्याचे समोर आले आहे.

अपघातामुळे प्रवाशांचे हाल: मिळालेल्या माहितीनुसार, पलटी झालेल्या टिपरमधील सांडपाणी रस्त्यावर पसरल्याने काळज परिसरात महामार्गाला चिखलाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हा पदार्थ अत्यंत चिकट असल्याने दुचाकीस्वारांच्या गाड्या घसरून पडत आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही मोठी जीवितहानी झाली नसली, तरी अनेक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

कंपनी व्यवस्थापनाचे स्पष्टीकरण: अपघातानंतर हा टिपर नेमका कोणाचा, याबाबत स्थानिकांमध्ये चर्चा सुरू होती. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा टिपर सुरवडी येथील ‘न्यू फलटण शुगर प्रायव्हेट लिमिटेड’च्या डिस्टलरी विभागाचा असल्याचे समजते. अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखून टिपर चालकाला पकडले. विचारपूस केली असता, त्याने ही गाडी न्यू फलटण शुगरची असल्याचे कबूल केले. मात्र, त्यानंतर संधी साधून चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी डिस्टलरीचे जनरल मॅनेजर श्री. पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सदरचा टिपर त्यांच्या कंपनीचा नसल्याचे प्राथमिक स्तरावर स्पष्ट केले आहे. न्यू फलटण शुगर प्रायव्हेट लिमिटेड डिस्टलरी डिव्हिजन ने घटनास्थळी त्यांचे प्रमोद साळुंखे नामक प्रतिनिधी पाठवले असता त्यांनीही उडवडीची उत्तरे दिली.

ग्रामस्थांची मागणी: दरम्यान, रस्त्यावर सांडलेले हे सांडपाणी तात्काळ साफ करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. रस्ता वेळीच स्वच्छ न केल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कंपनीवर कारवाई व्हावी, यासाठी काही ग्रामस्थ पोलीस प्रशासनाकडे दाद मागण्याच्या तयारीत आहेत. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

Spread the love