निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर होताच आचारसंहिता लागू; उमेदवारी अर्ज ‘ऑफलाईन’ भरता येणार
। लोकजागर । फलटण । दि. १४ जानेवारी २०२६ ।
ग्रामीण राजकारणाचा कणा असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेद्वारे अधिकृत कार्यक्रम जाहीर केला असून, आजपासूनच संपूर्ण जिल्ह्यात ‘आदर्श आचारसंहिता’ लागू झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अत्यंत वेगाने हालचाली करत आयोगाने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदानाचा दिनांक निश्चित केला आहे. आचारसंहिता लागू झाल्याने आता नवीन शासकीय कामांना ब्रेक लागला असून, प्रशासकीय यंत्रणा निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे.
निवडणुकीचा ‘हायव्होल्टेज’ कार्यक्रम आणि वेळापत्रक
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, इच्छुकांना येत्या १६ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २१ जानेवारीपर्यंत असून, अवघ्या ५ दिवसांच्या या कालावधीत कागदपत्रांची जुळवाजुळव करताना इच्छुकांची मोठी धावपळ उडणार आहे. २२ जानेवारीला अर्जांची छाननी केली जाईल, तर २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येतील. त्याच दिवशी दुपारी चिन्हांचे वाटप केले जाईल. ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:३० ते सायंकाळी ५:३० या वेळेत मतदान पार पडेल आणि ७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होऊन निकालाचे चित्र स्पष्ट होईल.
‘ऑफलाईन’ अर्ज प्रक्रियेचा महत्त्वाचा बदल
यावेळच्या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संपूर्णपणे ‘ऑफलाईन’ पद्धतीने पार पडणार आहे. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आयोगाने हा निर्णय घेतला असून, यामुळे इच्छुकांना दिलासा मिळाला असला तरी तहसील कार्यालयात मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजी प्रसिद्ध झालेली अंतिम मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
फलटण तालुक्यातील ८ गट आणि १६ गणांची रचना
फलटण तालुक्यात एकूण ८ जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांमध्ये हा रणसंग्राम होणार आहे. यामध्ये तरडगाव गटामध्ये पाडेगाव आणि तरडगाव या दोन गणांचा समावेश असून पाडेगाव, कुसूर, काळज यांसारखी गावे यात येतात. साखरवाडी-पिंपळवाडी गटामध्ये साखरवाडी आणि सस्तेवाडी या गणांची रचना असून यात होळ, जिंती, कांबळेश्वर सारख्या गावांचा समावेश आहे. विडणी गटामध्ये सांगवी आणि विडणी गणांचा समावेश आहे, तर गुणवरे गटामध्ये गुणवरे आणि आसू या दोन गणांचा समावेश करण्यात आला आहे.
बरड, कोळकी आणि वाठार निंबाळकर गटात चुरस
तालुक्यातील बरड गटामध्ये बरड आणि दुधेबावी या दोन गणांचा समावेश असून यात नाईकबोंमवाडी, राजुरी सारखी प्रमुख गावे येतात. कोळकी गटामध्ये कोळकी आणि जाधववाडी (फ) या दोन गणांचा समावेश आहे, जिथे गिरवी, विंचूर्णी सारख्या मोठ्या गावांचा समावेश होतो. वाठार निंबाळकर गटामध्ये वाठार आणि सुरवडी हे दोन गण असून यात वाखरी, उपळवे, निंभोरे या गावांचा समावेश आहे. सर्वात शेवटी हिंगणगाव गटामध्ये सासवड आणि हिंगणगाव या दोन गणांचा समावेश असून यात सालपे, आदर्की आणि कोपर्डे या गावांचा समावेश करण्यात आला आहे.
राजकीय तोफखाना धडाडणार
निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच फलटण तालुक्यात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानात कोणाची सरशी होणार आणि ७ फेब्रुवारीला विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली असून लवकरच प्रचाराचा नारळ फुटणार आहे.
