शहीद जवानाच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन रणजितदादांनी जपली संवेदनशीलता; विद्यमान खासदार मात्र गैरहजर : भाजपचे अनुप शहा आक्रमक

। लोकजागर । फलटण । दि. १४ जानेवारी २०२६ ।

बरड (ता. फलटण) येथील शहीद जवान विकास गावडे यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने फलटण तालुक्यात विद्यमान खासदार आणि माजी खासदार यांच्यातील कार्यपद्धतीचा फरक अनुप शहा यांनी चव्हाट्यावर आणला आहे. “मतदारसंघातील सुपुत्र शहीद झाल्यावर त्यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याचे सौजन्यही विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दाखवले नाही,” असा घणाघाती आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते अनुप शहा यांनी केला आहे.

रणजितदादांची संवेदनशीलता आणि भविष्यातील जबाबदारी

अनुप शहा यांनी यावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेचे कौतुक केले. “एकीकडे विद्यमान खासदार फिरकले नाहीत, तर दुसरीकडे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मनाची मोठी संवेदनशीलता दाखवत शहीद जवानाच्या चिमुकल्या मुलीच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. त्यांच्या याच लोकोपयोगी आणि संवेदनशील स्वभावामुळे आम्हाला फलटणचाच (आमच्या गावचा) खासदार हवा होता,” असे मत शहा यांनी व्यक्त केले. तालुक्यातील ‘विघ्नसंतोषी’ लोकांमुळेच एका कार्यक्षम नेतृत्वाचा पराभव झाला, अशी खंतही त्यांनी यावेळी बोलून दाखवली.

“पडलेल्यांनी शिकवू नये”

श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अनुप शहा अधिक आक्रमक झाले. “वास्तविक, खासदारांच्या अनुपस्थितीवर अनिकेतराजे यांनी जाब विचारायला हवा होता, पण तसे न करता ते केवळ आमच्या नेतृत्वावर (रणजितदादांवर) टीका करत आहेत,” असे शहा म्हणाले. त्यांनी पुढे इशारा देताना सांगितले की, “लोकसभेचा पराभव झाल्यावरही तिसऱ्याच दिवशी रणजितदादांनी कामाला सुरुवात केली. ज्यांना विधानसभा आणि नगरपालिकेत जनतेने घरी बसवले आहे, अशा ‘पडलेल्या’ लोकांनी निवडून आलेल्यांवर किंवा जनसामान्यांच्या नेत्यावर टीका करू नये.”

Spread the love