सातारा व अकोला जिल्ह्यातील ४ सुपुत्रांना वीरमरण आल्याने ‘लक्ष्मी विलास पॅलेस’वरील तिळगुळाचा कार्यक्रम केला रद्द
। लोकजागर । फलटण । दि. १५ जानेवारी २०२६ ।
भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यातील तीन आणि अकोला जिल्ह्यातील एक अशा एकूण चार जवानांना वीरगती प्राप्त झाल्यामुळे, विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यंदा मकर संक्रांतीचा सण साजरा केला नाही. दरवर्षी मकर संक्रांतीनिमित्त फलटणच्या ‘लक्ष्मी विलास पॅलेस’वर तिळगुळ समारंभ आणि शुभेच्छा भेटींचा मोठा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, अवघ्या तीन दिवसांत जिल्ह्याने आपले वीरपुत्र गमावल्याने, त्यांना श्रद्धांजली म्हणून यंदाचा सर्व कार्यक्रम रद्द केल्याचे श्रीमंत रामराजे यांनी जाहीर केले.
महाराष्ट्राला सुन्न करणाऱ्या चार दुर्दैवी घटना
गेल्या तीन दिवसांत भारतीय सीमेवर आणि आंतरराष्ट्रीय मोहिमेवर कर्तव्य बजावताना महाराष्ट्राच्या चार सुपुत्रांनी प्राणांची आहुती दिली आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनांमुळे संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. यात प्रामुख्याने नाईक विकास विठ्ठल गावडे (मु. बरड, ता. फलटण) दक्षिण आफ्रिकेतील सुदानमध्ये शांती मोहिमेवर असताना शहीद झाले. अभिजीत माने (मु. भोसे, ता. कोरेगाव): शांती मोहिमेवर असताना वीरमरण आले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, अवघ्या ८ तासांच्या आपल्या पोटच्या बाळाला न पाहताच त्यांनी जगाचा निरोप घेतला. प्रमोद परशुराम जाधव (मु. दरे, जि. सातारा): देशसेवा बजावताना शहीद झाले. वैभव श्रीकृष्ण लहाने (मु. कपिलेश्वर, जि. अकोला): १२ मराठा इन्फंट्रीचे जवान, काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना त्यांना वीरमरण आले. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी या वीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, “ज्यावेळी जिल्ह्याचे सुपुत्र देशासाठी सर्वोच्च बलिदान देत आहेत, अशा वेळी उत्सव साजरा करणे उचित नाही. शहीद जवानांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.”
